दहशतवादी कटाची योजना आखल्याच्या आरोपावरून नुकतीच उत्तर प्रदेशमधून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व संशयित आयसिसच्या खोरासन मॉड्युलशी संबंधित असल्याचा संशय एटीएसला आहे. देशात मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा कट आहे, हे तपासात उघडकीस आल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या तरुणांच्या घरवापसीसाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात विविध ठिकाणी राज्यांचे दहशतवादविरोधी पथक आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आयसिसशी काम करत असल्याच्या संशयावरून जवळपास १० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात उत्तर प्रदेशातील चार तरुणांचाही समावेश आहे. हे सर्व संशयित इस्लामिक स्टेटच्या (आयसिस) खोरासन मॉड्युलशी संबंधित असून, देशात मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची त्यांची योजना होती, असे समोर आले आहे. काही तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून आयसिसशी संपर्कात आहेत. क्रूर दहशतवादी संघटना असलेल्या आयसिसचा तरुणांवर प्रभाव वाढत आहे. त्यामुळे ते आयसिसच्या वाटेवर असल्याची दाट शक्यता दहशतवादविरोधी पथकाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतील ‘वाट चुकलेल्या’ तरुणांच्या ‘घरवापसी’साठी दहशतवादविरोधी पथकातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम १२ टप्प्यांत राबवली जाणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी गटांशी संपर्कात असल्याचा संशय असलेल्या पाल्यांच्या पालकांसाठी किंवा कुटुंबीयांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. जातीय दंगली भडकावण्यासाठी दहशतवादी गट १५ ते २५ वर्षे वयोगटातील मुलांना लक्ष्य करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने खबरदारी घेतली जाणार आहे. दहशतवादी गटांशी संपर्कात असल्याचे निदर्शनास आल्यास त्या मुलांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही एटीएसने सांगितले आहे. दहशतवादी गटांशी संपर्कात असल्याचा संशय असलेल्या विविध जिल्ह्यांतील २५ तरुणांच्या घरवापसीसाठी सुरुवातीला प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहितीही दहशतवादीविरोधी पथकाने दिली आहे. त्यात लखनऊ, कानपूर, वाराणसी, गोरखपूर, बिजनोर आणि मुझफ्फरनगर आदी जिल्ह्यांतील तरुणांचा समावेश आहे.