उत्तर प्रदेशातील बागपतजवळ यमुना नदीत आज सकाळी बोट बुडाली. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

बागपत शहराजवळील काठा गावातील ग्रामस्थांची शेती यमुनेजवळ आहे. काही ग्रामस्थ आज सकाळी यमुना नदीतून बोटीतून शेतावर जात होते. या बोटीत जवळपास ६० जण होते, असे सांगण्यात येत आहे. यमुना नदीत ही बोट बुडाली. यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात येत आहे. बोटीतून क्षमतेहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली. ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यात येत आहे.