बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगवास भोगत असलेल्या व्ही. एस. शशिकला नटराजन यांनी जर १० कोटी रुपयांचा दंड भरला नाही तर त्यांच्या शिक्षेमध्ये १३ महिन्यांची वाढ होईल असे तुरुंगाधिक्षक कृष्णा कुमार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे.  बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांना चार वर्षांचा तुरुंगवास झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ही शिक्षा ठोठावताना १० कोटी रुपयांचा दंड देखील लावला होता. जर शशिकला यांनी दंड भरला नाही तर त्यांच्या शिक्षेत वाढ होईल असे कृष्णा कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

अण्णा द्रमुक पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन या सध्या परापन्ना अग्रहारा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या चार वर्षांच्या शिक्षेपैकी २१ दिवसांची शिक्षा त्यांनी याआधी भोगलेली आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांनी ही शिक्षा भोगली होती. शशिकला, इल्लावरसी आणि सुधाकरन हे तिघे या एकाच तुरुंगात आहेत. शशिकला यांना सामान्य कैद्यांप्रमाणेच वागणूक मिळत आहे असे तुरुंगाधिक्षकांनी सांगितले आहे. त्यांना एका लहान सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. इतर कैद्यांप्रमाणेच त्यांना वागणूक दिली जात असल्याचे ते म्हणाले.

बेहिशेबी संपत्ती जमवल्याबद्दल तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्याविरुद्ध गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात कर्नाटक उच्च न्यायालयाने जयललिता यांना दिलासा दिला होता. या प्रकरणी त्यांना आरोपांमधून दोषमुक्त करण्यात आले होते. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाकडून जयललिता यांच्यावरील खटल्याचा निर्णय देण्यात येणार असल्याने बेंगळुरुमध्ये कलम १४४ लागू करून येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

जयललिता यांना उच्च न्यायालयाने दोषमुक्त केल्याच्या निर्णयाविरोधात कर्नाटक सरकारने २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तर कर्नाटकमधील विशेष न्यायालयाने २०१४ मध्ये या प्रकरणात जयललिता यांच्यासह त्यांच्या जवळच्या सहकारी शशिकला यांना दोषी ठरवून चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. बेहिशेबी संपत्ती जमवल्याबद्दल त्यांच्यावर खटला सुरू असल्याने त्यांना काही काळासाठी मुख्यमंत्रिपदही सोडावे लागले होते. मात्र, २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून त्या पुन्हा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये ओ. पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री झाले होते. त्यांना पदावरुन काढून शशिकला यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. परंतु, या खटल्याचा निकाल लागल्यामुळे त्यांचे स्वप्न भंग झाले. तुरुंगात येण्यापूर्वी त्यांनी आपले विश्वासू इ. पलानीस्वामी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली.