कन्नड साहित्यातील नवोदयवादाचे प्रणेते आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक यू.आर.अनंतमूर्ती यांचे येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ‘समीक्षकांपासून चाहत्यांपर्यंत सर्वानाच आपल्या लेखनाने मोहिनी घालणारे साहित्यिक’ असा त्यांचा लौकिक होता. ताप आणि संसर्ग यामुळे गेले १० दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि दोन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.
अनंतमूर्ती यांनी आपल्या कसदार लेखनाद्वारे कन्नड साहित्याची दिशा बदलली होती. नोकरशहा-राजकारणी, वडील-मुलगी, पिता-पुत्र यांच्यातील नातेसंबंधांचे नवनवीन आयाम त्यांनी आपल्या लेखनातून उलगडून दाखविले होते. त्यांच्या पाच कादंबऱ्यांवर चित्रपटांचीही निर्मिती करण्यात आली होती. तर, अनेक कादंबऱ्या आणि लेखसंग्रहांचे विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आले होते.
अनंतमूर्ती हे गेली काही वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. त्यांचे नियमित डायलिसिसही करण्यात येत होते. त्यातच त्यांना मधुमेह आणि हृदयविकार जडला. त्यामुळे गेले दहा दिवस त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री त्यांची त्यांना श्वसनास त्रास होऊ लागला, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाचे संचालक आणि वैद्यकीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष एच. सुदर्शन बल्लाळ यांनी दिली.  
पाच कादंबऱ्या, एक नाटक, आठ लघुकथा संग्रह, तीन कवितासंग्रह अशी मूर्ती यांची  साहित्यसंपदा आहे. त्यांचे बरेचसे लिखाण भारतीय तसेच युरोपीय भाषांत अनुवादित झाले आहे. त्यांची पहिलीच कादंबरी ‘संस्कार’ प्रचंड लोकप्रिय ठरली. त्या कादंबरीवर निघालेला चित्रपट हा कन्नड समांतर सिनेमासाठी आजही दिशादर्शक मानला जातो. केरळ आणि कर्नाटकातील विद्यापीठांचे कुलगुरूपदही त्यांनी भूषविले होते. अनंतमूर्ती यांच्या निधनाबद्दल कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून त्यांना श्रद्धांजली म्हणून राज्यातील सर्व कार्यालये व शिक्षणसंस्थांना शनिवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
बुकरच्या रांगेत अनंतमूर्ती..