देशातील आघाडीची  आयटी कंपनी इन्फोसिसच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागेवर यू.बी.प्रवीण राव यांची कंपनीच्या हंगामी एमडी आणि सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिक्का यांचा राजीनामा त्वरीत स्वीकारत त्यांना पदोन्नती देत कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. कंपनीकडून बीएसईला (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) या बदलाबाबत कळवण्यात आले आहे. पूर्णवेळ सीइओची नेमणूक ३१ मार्च २०१८ पूर्वी केली जाणार आहे. दरम्यान, सिक्का यांच्या राजीनाम्याचे वृत्त येताच इन्फोसिसच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.

 

कंपनीच्या कामकाजात बदल, वेतन वाढ, नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाढती संख्या, कंपनी सोडणाऱ्यांना देण्यात येणारा मोबदला (सेवरन्स पे) आदी विविध बाबींवरून प्रमोटर्स सातत्याने आवाज उठवत होते. विशषत: कंपनीचे सहसंस्थापक नारायणमूर्ती या मुद्यांवर नाराज होते. कंपनीचे माजी सीएफओ राजीव बन्सल यांना देण्यात आलेल्या सेवरन्स पेवर आक्षेप नोंदवण्यात आला होता.

इन्फोसिसने सिक्का यांची दि. १ ऑगस्ट २०१४ रोजी सीईओपदी नियुक्ती केली होती. २०१५-१६ मध्ये त्यांना ५० कोटी रूपयांचे पॅकेज मिळाले होते तर २०१६ मध्ये त्यात वाढ करून ७४ कोटींचे पॅकेज देण्यात आले होते.

दरम्यान, आपल्या चांगल्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सिक्का यांनी आपल्या राजीनामा पत्रात केला आहे. माझ्या कामात सातत्याने अडथळे निर्माण करण्याचे काम केले जात, असे त्यांनी म्हटले आहे.