अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील बर्लिंग्टन शहरातील एका गजबजलेल्या मॉलमध्ये अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. हल्लेखोर लॅटिन अमेरिकेतील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून, बर्लिंग्टन शहरातील कॅसकेड मॉलमध्ये लपलेल्या बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. पोलीस बंदुकधारी व्यक्तीचा शोध घेत आहेत. या घटनेत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या मॉलमध्ये रेस्तराँ आणि चित्रपटगृहे असल्याने नेहमी मोठी गर्दी असते.
करड्या रंगाचे कपडे घालून आलेल्या बंदुकधारी व्यक्तीने मॉलमध्ये प्रवेश करताच गोळीबार सुरु केल्याचे प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.