राजधानी दिल्ली आणि परिसरात बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनादेखील या पावसाचा फटका बसला आहे. जॉन केरी सध्या दुसऱ्या इंडो-यूएस स्ट्रॅटेजिक अॅण्ड कर्मशियल चर्चेसाठी सध्या भारतात असून त्यांनी आज दिल्ली आयआयटीतील कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी येताना पावसामुळे ठप्प झालेले दिल्लीतील जनजीवन केरी यांच्या दृष्टीस पडले. त्यामुळे केरी यांनी आयआयटीत भाषण करताना विद्यार्थ्यांना तुम्ही इथे बोटीने आलाता का?, असा प्रश्न विचारला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या व त्यांचा उत्साह पाहून त्यांनी आश्चर्य व आनंदही व्यक्त केला. तसेच इतक्या मुसळधार पावसातही या कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल केरी यांनी विद्यार्थ्यांना सलाम केला आणि त्यांचे आभारही मानले.
दिल्लीत आज सकाळी सात वाजल्यापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अद्यापही पाऊस सुरूच आहे. पावसामुळे दिल्लीतील बहुतेक परिसर पाण्याखाली आला आहे. सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आल्याने सगळीकडे अंधार पसरला आहे. पावसामुळे सखल भागात प्रचंड पाणी साचले असून याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. जॉन केरी आज दिल्लीतील काही धार्मिक स्थळांना भेट देणार होते. मात्र पावसामुळे त्यांचे वेळापत्रकही कोलमडले असून त्यांचा आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत आगामी काही तास पाऊस असाच पुढे सुरू राहणार आहे. दिल्लीसह गाझियाबाद आणि नोएडा येथेही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.