अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या आणि अवघ्या ३० मतांनी पराभूत झालेल्या ३८ वर्षीय महिला उमेदवाराने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सुप्रिया डे असे या मृत महिला उमेदवाराचे नाव असून तृणमूल काँग्रेसशी बंडखोरी करत त्यांनी अपक्ष म्हणून स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक लढवली होती. कूपर्स कँप येथील जागेवर अवघ्या ३० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. दि. १३ ऑगस्ट रोजी मतदान तर गुरूवारी मतमोजणी झाली होती. निकालानंतर अवघ्या काही तासांत वेगवेगळ्या ३५ प्रकारच्या गोळ्या खाऊन त्यांनी आत्महत्या केली.

सुप्रिया डे या गेल्या १० वर्षांपासून कूपर्स कँपच्या वॉर्ड क्रमांक एकच्या नगरसेविका होत्या. आत्महत्या करण्याच्या काही वेळापूर्वीच त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुप्रिया यांचे पती समीर यांनी आपण अजनूही पक्षाचे कार्यकर्ता असल्याचे म्हटले. पक्षातील काही कार्यकर्त्याने धमकावल्यामुळे व अपशब्द वापरल्यामुळे सुप्रिया या मानसिक तणावाखाली होत्या, असा आरोप त्यांनी केला. परंतु, याप्रकरणी आपण पोलिसांकडे कोणतीही तक्रार करणारी नसल्याचे म्हटले. संबंधित कार्यकर्त्यावर पक्षाने कारवाई करावी, असे ते म्हणाले.

समीर यांच्या मते, सुप्रिया यांना सकाळी ८.४० वा. त्या ३० मतांनी पराभूत झाल्याचे समजले. त्यांचे प्रतिस्पर्धी तृणमूलचे उमेदवार अशोक सरकार यांना ३५० तर सुप्रिया यांना ३२० मते मिळाली होती. मतदानादिवशी तृणमूलच्या मतदान प्रतिनिधीबरोबर मोठा वाद झाला होता. सुप्रिया यांनी या कार्यकर्त्याला थप्पडही लगावली होती. त्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीच्या मतदानावर आक्षेप नोंदवला होता. आजारी आजोबांऐवजी एक युवक मतदान करत होता. त्याला या कार्यकर्त्याने आक्षेप नोंदवला होता.

वर्ष २००७ मध्ये सुप्रिया या काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आल्या होत्या. २०१२ मध्ये त्या पुन्हा काँग्रेसकडून उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या. २०१२ मध्ये विजयानंतर त्या तृणमूलमध्ये सहभागी झाल्या होतया. त्यावेळी इतर १२ नगरसेवकांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उभारण्याचा निर्णय घेतला होता.

सुप्रिया यांनी रक्तदाब, थायरॉइड, मधुमेह आदी ३५ प्रकारच्या गोळ्या एकाचवेळी खाल्या होत्या. दुपारी एक वाजता त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुमारे अडीचच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.