उत्तराखंडमध्ये मुस्लिम समाजातील सरकारी कर्मचा-यांना शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी दोन तासांचा ब्रेक देण्याच्या निर्णयावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. हिंदू धर्मातील सरकारी कर्मचा-यांनी सोमवारी शिवपुजेसाठी किंवा मंगळवारी हनुमान पुजेसाठी दोन तासांची सवलत मागितली तर द्याल का असा सवाल भाजप प्रवक्ते नलिन कोहली यांनी उपस्थित केला आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी शनिवारी उत्तराखंडमधील मुस्लिम समाजातील सरकारी कर्मचा-यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. यानुसार मुस्लिम कर्मचा-यांना शुक्रवारी नमाज अदा करता यावी यासाठी कामाच्या तासात दोन तासांची सवलत देण्यात आली होती. या कालावधीत कर्मचारी मशिदीत जाऊन नमाज अदा करुन येऊ शकतील. उत्तराखंड सरकारचा हा निर्णय आता वादग्रस्त ठरत आहे. सोमवारी भाजप प्रवक्ते नलिन कोहली यांनी उत्तराखंडमधील काँग्रेस सरकारवर टीकास्त्र सोडले. मुस्लिमांप्रमाणेच हिंदू समाजातील सरकारी कर्मचा-यांनाही पुजाअर्चनेसाठी कामाच्या तासात दोन तासांची सवलत द्याल का असा प्रश्न त्यांनी विचारला. रावत सरकार हे मतांसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकते अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपकडून टीका सुरु झाली असली तरी दुसरीकडे काँग्रेसने मात्र रावत सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. उत्तराखंडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय म्हणाले, जर हा निवडणुकीसाठीचा स्टंट आहे तर १४०० कोटी रुपये आणि ८०० टन सोने खाऊन राम मंदिर तयार झाले असा टोला त्यांनी लगावला. उत्तरप्रदेशमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाकडून पुन्हा एकदा राममंदिराचा मुद्दा पुढे नेला जात असून यापार्श्वभूमीवर उपाध्याय यांनी हे विधान केले आहे.

भाजप खासदार प्रवेश शर्मा यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिम समाज भाजपपासून लांब राहणे पसंत करतो असा माझा अनुभव असल्याचे प्रवेश शर्मा यांनी सांगितले. तर शिवसेनेने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही हा मुद्दा संसदेत मांडू असे शिवसेनेने सांगितले आहे.