आशिया आणि आफ्रिका पाठोपाठ ‘झिका’ विषाणूचा आता भारतातही शिरकाव झाला आहे. देशात पहिल्यांदाच झिका विषाणूचे तीन रूग्ण आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे हे तीनही रूग्ण हे अहमदाबादमधील बापूनगर परिसरात आढळून आले आहेत. यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. या महिलेची जानेवारी महिन्यात चाचणी घेतली होती. भारतातही झिका विषाणूचे रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर बापूनगर येथील या तिन्ही रूग्णांना झिका विषाणूची लागण झाल्याचे म्हटले आहे. अहमदाबाद येथील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेहत आरटी-पीसीआर चाचणीच्या माध्यमातून झिका व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुण्यातील नॅशनल इन्सिट्टयूट ऑफ व्हायरालॉजी येथेही ४ जानेवारी रोजी आरटी-पीसीआरची पुन्हा एकदा चाचणी घेऊन याबाबत खात्री करून घेण्यात आली.

मी सुद्धा काही तासांपूर्वी हा अहवाल वाचला. परंतु, सध्या मी याबाबत काही बोल शकणार नाही. आम्ही या सर्व बाबींवर लक्ष ठेऊन आहोत. डासांचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न करू, असे अहमदाबाद महापालिकेचे डॉ. विजय कोहली यांनी म्हटले. विशेष म्हणजे गुजरात सरकारने २०२२पर्यंत मलेरियामुक्त गुजरात ही मोहीम सुरू केली आहे.

सध्या सतर्क राहण्याची गरज आहे. झिका आणि डेंग्यूचे विषाणू एकच आहेत. त्यामुळे झिकाची लागण होणे सहजशक्य आहे. सध्या परिस्थिती धोकादायक आहे, असे इंडियन इन्स्टि्टयूट ऑफ पब्लिक हेल्थचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. दीपक सक्सेना यांनी म्हटले. गर्भारपणाच्या काळात आईकडून नवजात बाळाला ‘झिका’ विषाणूचा संसर्ग होतो. यामध्ये व्हायरस बाळाच्या अविकसित मेंदूवर थेट हल्ला करतो. अशा प्रकारामुळे जन्माला येणार्‍या बाळाचे डोके शरीराच्या तुलनेत छोटे असते. या आजाराला ‘मायक्रोसेफली’ म्हणतात, असेही ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ३४,२३३ मानवी नमुने आणि १२,६४७ डासांचे नमुने घेऊन चाचणी केली होती. त्यातील सुमारे ५०० डासांचे नमुने हे अहमदाबादमधील बापूनगर परिसरातील होते. यातीलच काही नमुने हे झिकासाठी निगेटिव्ह आढळून आले, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर म्हटले आहे.

याबाबत आरोग्य मंत्री शंकर चौधरी आणि आरोग्य विभागाचे आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. बी.जे. मेडिकल कॉलेजने १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान घेतलेल्या रक्त चाचणीत एका ६४ वर्षीय वृद्धामध्ये झिकाचे पॉझिटिव्ह विषाणू आढळून आले. दुसऱ्या एका प्रकरणात ३४ वर्षीय महिलेमध्ये झिकाचे विषाणू आढळून आले. ९ नोव्हेंबर २०१६ मध्ये ताप येत असल्यामुळे या महिलेला बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते.

तिसऱ्या घटनेत जानेवारी महिन्यात एका २२ वर्षीय गर्भवती महिलेच्या रक्तात झिका व्हायरसचे विषाणू आढळून आले. त्यावेळी ती ३७ आठवड्यांची गर्भवती होती.

कसा पसरतो ‘झिका विषाणू’
एडिस जातीच्या डासाने पसरणारा हा एक आजार आहे. या जातीच्या डासाच्या दंशामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियादेखील पसरतो.

काय आहेत लक्षणे
झिका व्हायरसमुळे ‘फ्लू’ची लक्षणे आढळून येतात. यामध्ये सौम्य ताप, डोळे लाल होणे, डोकेदुखी, अंगावर रॅशेस येणे अशी लक्षणे दिसून येतात. डासाच्या दंशानंतर किमान २ ते ७ दिवसांमध्ये हे लक्षण आढळून येतात.

याचा धोका कोणाला ?
रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या हृदयविकार, मधुमेह आणि यकृतांचे विकार असलेल्या रुग्णांना धोका अधिक असतो. वयोवृद्ध, गर्भवती स्त्रिया व लहान मुलांना याचा संसर्ग अधिक होऊ शकतो.

कशी घ्यावी खबरदारी
या व्हायरसचा धोका डासांमुळे पसरत असल्याने आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे. डबकी किंवा घरात फार दिवस पाणी भरलेले राहणार नाही याची काळजी घेणे.