अखिलेश हा सध्या रामगोपाल यादव यांच्या सांगण्याप्रमाणे वागत आहे. त्याने माझे ऐकले नाही तर , मी त्याच्याविरूद्ध लढेन, असे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी सांगितले. ते सोमवारी लखनऊ येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षात रंगलेला कलह काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुलायम सिंह यांनी रविवारी अखिलेश यादव हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असून आमच्या पक्षात कोणतेही भांडण नसल्याचे सांगितल्यानंतर या वादावर पडदा पडेल, असे वाटत होते. मात्र, आज मुलायमसिंह यादव यांनी रामगोपाल यादव यांचे कारण पुढे करत नव्याने भांडण उकरून काढले आहे. दरम्यान, आज समाजवादी पक्षाच्या लखनऊ येथील मुख्यालयात मुलायमसिंह यादव यांच्याबरोबरीने सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अखिलेश यादव यांच्या नावाचीही पाटी लावण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद शमेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, त्याचवेळी लखनऊ येथील भाषणात मुलायमसिंह यादव यांनी पुन्हा एकदा अखिलेश यांच्यावर टीका केली. या परस्परविरोधी घटनांमुळे समाजवादी पक्षातील गोंधळाचे वातावरण कायम आहे.

अखिलेश यांच्यावर टीका करताना ते मुस्लिमविरोधक असल्याचा आरोप ही त्यांनी केला. पत्नी व मुलांची शपथ दिल्यानंतर ते माझ्याशी बोलण्यास आले. पण एक मिनिटांतच काहीही न ऐकता ते उठून गेल्याचा नवा खुलासा पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना केला. ते म्हणाले, मी अनेकवेळा अखिलेशला चर्चेसाठी बोलावले. परंतु ते आले नाहीत. अखिलेश माझा मुलगा आहे. पण मला माहित नव्हतं की ते विरोधकांना जाऊन मिळतील. माझा मुलगा दुसऱ्याच्या हातातील खेळणं झाला आहे. रामगोपाल यांनी पक्षाला बरबाद करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही, असा आरोप केला. सायकल चिन्ह मिळण्याचा आज निर्णय होईल. चिन्ह मिळो अथवा न मिळो, तुम्ही मला साथ द्या, असे भावनिक आवाहन केले. याचदरम्यान कार्यकर्त्यांनी पक्ष वाचवण्याची घोषणा करण्यास सुरूवात केली. या वेळी मुलायम यांनी सर्वांना रागावून गप्प बसवले.