उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला शीला दीक्षित यांच्यासह प्रियंका गांधी यांनीही हजेरी लावल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. या बैठकीत उत्तरप्रदेश निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे राहुल गांधींऐवजी आता काँग्रेसने प्रियंका गांधी यांचा आधार घेतला की काय यावर तर्कवितर्क लढवले जात आहे.
पुढील वर्षी उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शीला दीक्षित या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील हे काँग्रेसने यापूर्वीच जाहीर केले आहे. पण शीला दीक्षित यांना निवडणुकीत राहुल गांधींऐवजी प्रियंका गांधी यांनी धूरा सांभाळावी असे वाटते. समाजवादी पक्षातील कौटुंबिक कलहाचा फायदा घेण्याचे मनसुबे काँग्रेसने रचले आहेत. पण भाजपसमोर काँग्रेस पिछाडीवर दिसत असल्याने बिहारच्या धर्तीवर उत्तरप्रदेशमध्येही बिहारच्या महाआघाडीसारखा प्रयोग करायचा अशी शीला दीक्षित यांची रणनिती आहे. यासाठी प्रियंका गांधी यांनी मैदानात उतरावे आणि त्यांनी रणनिती आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी असे दीक्षित यांना वाटते.
प्रियंका गांधी यांनी सोमवारी पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत सहभाग घेतल्याने त्या सक्रीय राजकारणात येणार अशी चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. पण प्रियंका गांधी यांनी सक्रीय होण्यामागे राहुल गांधी यांचे अपयश कारणीभूत आहे की राहुल गांधी यांना बळ देण्यासाठी प्रियंका गांधी मैदानात उतरल्या असा प्रश्नही आता उभा राहण्याची शक्यता आहे.  शीला दीक्षित यांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय घेण्याचे भाजपचे प्रयत्न जनताच हाणून पाडणार असे त्यांनी सांगितले. राहुल गांधींना आणखी बळ देण्याचे काम प्रियंका गांधी करतील असे सूचक विधान त्यांनी केले आहे. राहुल गांधी यांची किसान यात्रा यशस्वी ठरत असून प्रियंका गांधीही मैदानात उतरल्यास पक्ष आणखी मजबूत स्थितीत पोहोचेल असे त्यांनी सांगितले.