23 October 2017

News Flash

यशवंत सिन्हा देशद्रोही: केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो

यशवंत सिन्हाजी हे काय करत आहात तुम्ही ?, असा सवाल त्यांनी केला.

नवी दिल्ली | Updated: October 13, 2017 12:49 PM

केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी सिन्हा यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

देशाच्या जीडीपीत झालेली घसरण, बिघडती अर्थव्यवस्था यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधणारे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांवर अजूनही भाजपकडून टीका केली जात आहे. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी सिन्हा यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची भेट घेतल्यावरून सिन्हा यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्या सुप्रियो यांनी सिन्हा हे देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे. सुप्रियो यांनी एक ट्विट केले असून ते (यशवंत सिन्हा) हे एका देशद्रोहीसारखे आहेत. काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना भेटण्याशिवाय त्यांच्याकडे कोणते काम नाही, असे म्हटले आहे.

यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये त्यांनी यशवंत सिन्हाजी हे काय करत आहात तुम्ही ? त्यांच्याकडे भाजपला देण्यास काहीही नाही पण आमच्यासारख्या नव्या पिढीकडे प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्यासाठी संपूर्ण अधिकार आहेत. आमचं नुकसान का करत आहात?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नेटिझन्सनीही सुप्रियो यांना उत्तर देत त्यांच्या वक्तव्याला विरोध केल्याचे दिसले. यशवंत सिन्हांना बोलण्याइतपत तुमची पात्रता आहे का बाबूल. तुम्ही तर पुढच्या वेळी संसदेत याल की नाही हेही सांगता येणार नाही. याचवेळी चुकून आलात, असे म्हणत एक युजरने टोला लगावला.

गायक असलेल्या बाबूल सुप्रियोंना भाजपने राजकारणात आणले होते. लोकसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर पश्चिम बंगालमधून निवडून आले. खासदार होताच त्यांना केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात आली. सुप्रियोंनी अनेक हिंदी चित्रपटात पार्श्वगायन केले आहे.

दरम्यान, यशवंत सिन्हा यांनी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाचा केंद्रीय मंत्र्यांनी बचाव केल्याचा निषेध करत त्यावर टीका केली होती. पक्षाने आपला उच्च नैतिक आधार गमावला असल्याचे त्यांनी म्हटले होते. ‘द वायर’ वर १०० कोटींच्या मानहानीचा दावा दाखल करण्यावर आक्षेप नोंदवला. माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

First Published on October 13, 2017 12:49 pm

Web Title: yashwant sinha is traitor says union minister babul supriyo