योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा एक कट्टर हिंदुत्ववादी नेत्याची आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते राजकारणात आहेत. त्यांच्या अनेक वक्तव्यांवरुन वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ हे मुस्लिम विरोधी अशी बहुतेकांची धारणा आहे. जर, त्यांच्या मतदारासंघातील लोकांना विचाराल तर त्यांच्याबद्दल एकदम वेगळे काही ऐकायला मिळेल.

आदित्यनाथ हे २६ व्या वर्षी खासदार झाले. तेव्हापासून आतापर्यंत ते नित्यनेमाने आपला जनता दरबार भरवतात. या दरबारामध्ये श्रीमंत-गरीब, पुरुष-महिला असा काही भेद नसतो तसेच मदत मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा धर्म किंवा जातही पाहिली जात नाही. त्यांच्या दरबारात सर्वांना समान वागणूक मिळते असे त्यांच्या मतदारसंघातील लोकांचे म्हणणे आहे.

प्रश्न कितीही छोटा असो वा मोठा आदित्यनाथ त्यांच्याकडे समस्या घेऊन आलेल्या व्यक्तीला निराश कधीच करत नाही. शमशेर आलम या गृहस्थाला आपल्या बहिणीच्या शस्त्रक्रियेसाठी लखनौला जायचे होते परंतु रेल्वेचे रिजर्वेशन कन्फर्म नव्हते. अशावेळी ते आदित्यनाथ यांच्या कार्यालयात आले. आदित्यनाथ यांच्या सहकाऱ्यांना त्यांना ताबडतोब शिफारसपत्र दिले. शमशेर अली सारखे शेकडो लोक त्यांच्या दरबारात येतात आणि त्यांच्याकडून कामे करुन घेतात.

राज्यात मुख्यमंत्री कुणीही असो जर तुम्ही आदित्यनाथ यांचे पत्र घेऊन गेलात तर तुमचे काम कुणीही टाळत नाही असा माझा अनुभव आहे. असे आलम यांनी सांगितले. रेल्वे आरक्षण असो वा सचिवालयात काम त्यांचे पत्र घेऊन गेल्यास शंभर टक्के काम होते असा आमचा अनुभव आहे.चौधरी कैफुल यांना हज यात्रेला जायचे होते. त्यासाठी अनुदान मिळावे म्हणून ते आदित्यनाथ यांच्याकडे गेले. आदित्यनाथ यांनी त्यांना पत्र दिले. याआधी देखील आपण आदित्यनाथ यांच्याकडे मदतीसाठी आलो होते अशी आठवण त्यांनी सांगितली. एकदा एका मशिदीच्या जमिनीवर अनधिकृत ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला होता. ही बाब आम्ही आदित्यनाथांच्या कानावर घातली. त्यांनी याबाबत कायदेशीर कारवाईचे आश्वासन देताच अतिक्रमण हटवण्यात आले होते.

आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील मुस्लिमांनी आनंदोत्सव साजरा केला. आदित्यनाथ हे दोन्ही समाजाच्या उत्कर्षासाठी झटतात असे एका मुस्लिम कार्यकर्त्याने म्हटले. आपण गेल्या १४ वर्षांपासून आदित्यनाथ यांच्यासोबत काम करत आहोत असे ते म्हणाले. त्यांच्या बाबतीत विरोधकांनी नाही त्या गोष्टी पेरल्या आहेत असे देखील ते म्हणाले. आदित्यनाथ हे कधीच कुणासोबत भेदभाव करत नाहीत असे ते म्हणाले.