गुगलकडून एका नव्या अॅपची घोषणा करण्यात आली आहे. ‘युट्यूब गो’ नावाच्या या अॅपमध्ये ऑफलाईनला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘युट्यूब गो’मुळे वापरकर्त्याचा कमीतकमी डेटा वापरला जाणार आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये हे अॅप वापरकर्त्यांना डाऊनलोड करता येईल, अशी माहिती यूट्यूब ब्लॉगमधून देण्यात आली आहे.

या अॅपमध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. या अॅपमुळे तुम्हाला पाहायचा असलेला व्हिडीओ किती एमबीचा आहे, याची माहिती तुम्हाला आधीच मिळणार आहे. याशिवाय या अॅपमुळे इंटरनेट सेवा बंद असतानाही तुम्ही व्हिडीओ शेअर करु शकता. तुम्हाला जो व्हिडीओ पाहायचा आहे, त्यात नेमके काय आहे, हेदेखील तुम्ही थंबनेलमध्ये पाहू शकता. तुम्ही व्हिडीओ पाहण्याआधी किंवा सेव्ह करण्याआधी तो नेमका किती एमबीचा आहे, हेदेखील युट्यूब गो या अॅपवर तपासू शकता.

इंटरनेट नसतानाही होऊ शकणारे शेअरिंग हे या नव्या अॅपचे महत्त्वपूर्ण वैशिष्टय आहे. जर इतर एखाद्या व्यक्तीकडे युट्यूब गो असेल, तर तुम्ही इंटरनेट शिवाय त्याच्यासोबत व्हिडीओ शेअर करु शकता.

युट्यूब गोमुळे तुम्हाला तुमच्या देशात कोणते व्हिडीओ पाहिले जात आहेत, याबद्दलची माहिती मिळेल. यासोबतच तुम्ही राहात असलेल्या भागात कोणते व्हिडीओ पाहिले जात आहेत, याचीही माहिती युट्यूब गो वर उपलब्ध असणार आहे.

२०१४ मध्ये युट्यूबने ऑफलाईन मोड ही सुविधा सुरू केली होती. यामुळे इंटरनेट नसतानाही व्हिडीओ पाहण्याची सोय वापरकर्त्यांना उपलब्ध झाली. याशिवाय या वर्षाच्या सुरुवातीला स्मार्ट ऑफलाईन हा पर्याय युट्युबने सुरू केला. यामुळे डाऊनलोडिंगचा दर कमी असताना म्हणजेच रात्रीच्या वेळी व्हिडीओ डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली.

या नव्या सुविधांमुळे लोकांना डेटावर करावा लागणारा खर्च कमी होईल, अशी अपेक्षा युट्यूबकडून व्यक्त करण्यात आली आहे. युट्यूब गो हे अॅप स्मार्ट आणि फास्ट असेल, असा दावा युट्यूबकडून करण्यात आला आहे.