चेन्नई-मंगलोर एक्स्प्रेसचे चार डबे आज पहाटे रूळावरून घसरल्याने ३९ प्रवासी जखमी झाले. दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे दोन वाजता मंगलोरकडे जाणाऱ्या गाडीचे चार डबे कडलोर जिल्ह्य़ात व्रिद्धाचलम येथे घसरले. एकूण ३९ जखमी प्रवाशांपैकी ३६ जणांना प्रथमोपचारानंतर सोडण्यात आले. इतरांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या गर्दीच्या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळित झाली असून अनेक गाडय़ा जवळच्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. काही गाडय़ा पर्यायी मार्गानी पाठवल्या असून त्या विलंबाने धावत आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन परिस्थितीचा आढावा घेत असून अडकून पडलेल्या प्रवाशांना नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे.जयललिता यांनी गंभीर जखमींना ५० हजार तर जखमींना २५ हजार रूपये भरपाई जाहीर केली आहे. जयललिता यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले असून जखमींना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.व्रिद्धाचलन व कडलोर जिल्हा प्रशासनाने जखमींना वैद्यकीय मदत केली आहे. दरम्यान रेल्वेने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, याप्रकरणी जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत, असे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.