दिल्लीत गेल्या आठवडय़ात २३ वर्षांच्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या भीषण घटनेनंतर देशाच्या राजधानीतीलच नव्हे, तर अन्य प्रमुख शहरांमधील महिला कर्मचाऱ्यांच्या आत्मविश्वास ढासळला असल्याचे एका पाहणीद्वारे उघडकीस आले आहे. ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया’(अ‍ॅसोचेम) ने यासंदर्भात पाहणी केली होती. सरकारी कारभारात आमूलाग्र बदल करतानाच ‘अति-अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या’ संरक्षणाची मानसिकता आता बदलून सर्वसामान्य लोकांसाठीच पोलीस संरक्षण अधिक प्रमाणावर उपलब्ध होणे आवश्यक आहे, असेही मत लोकांनी यासंदर्भात मांडले आहे.
‘अ‍ॅसोचेम’ ने या मुद्दय़ावर दिल्लीतील तसेच प्रमुख शहरांमधील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या २,५०० महिला व पुरुषांची कर्मचाऱ्यांची मते जाणून घेतली. सध्या निर्माण झालेल्या कमालीच्या असुरक्षिततेच्या वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर महिला कर्मचाऱ्यांनी आपले कामाचे तास संपल्यानंतर तातडीने घरी जावे, असा आग्रह वरिष्ठांकडून धरला जात असल्याचे सांगण्यात आले. या दुर्देवी तरुणीला तातडीने न्याय द्यावा आणि अपराध्यांना कठोर शासन करावे, अशीही मागणी असंख्य महिलांनी केली.
दिल्लीतील या घटनेनंतर स्थानिक महिलावर्गच धास्तावला असे नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही या भीषण घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, अनेक शहरांमधील महिलांना आपल्या शीलाच्या रक्षणाची खात्री वाटेनाशी झाली आहे. ज्या युवती भाडय़ाच्या बसगाडय़ांमधून कामावर जातात, त्यांच्या पालकांना आपल्या कन्येच्या सुरक्षेबद्दल कमालीची चिंता निर्माण झाली आहे. सुमारे ८८ टक्के पालकांनी यासंदर्भात आपली चिंता व्यक्त केली.