दिल्ली पोलिसांनी उबर कंपनीच्या टॅक्सीचालकाकडून आयफोन जप्त केला आहे. या चालकाने शुक्रवारी एका कंपनीत काम करणाऱ्या २७ वर्षांच्या अधिकारी महिलेवर टॅक्सीत बलात्कार केला होता. या महिलेने रात्रीची वेळ असल्याने कंपनीच्या अ‍ॅपवरून टॅक्सीचे बुकिंग केले होते. चालक शिवकुमार यादव याला दिल्ली पोलिसांनी मथुरेत अटक केल्यानंतर त्याच्याकडे स्मार्टफोन सापडला जो कंपनीने दिलेला होता. तो फोन ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्याच्याबरोबर गेले होते. यादव याच्याकडे दोन ते तीन फोन सापडले आहेत. उबर कंपनी कॅब चालकांना आयफोन देत असते व त्यावर उबर अ‍ॅप असते. ग्राहक या अ‍ॅपच्या मदतीने टॅक्सी बुक करू शकतात. त्याने ते काम स्वीकारल्यानंतर चालकाचे नाव, फोटो, नोंदणी क्रमांक व इतर तपशील ग्राहकाला दिला जातो.
फोन हा यात महत्त्वाचा पुरावा असतो. त्यातून उबर कंपनीसाठी यादव काम करीत होता हे सिद्ध करता येणार आहे. तोच गाडी चालवत होता हे यातून सिद्ध करता येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. जीपीएसवरून तो कुठल्या रस्त्याने गेला तिला कुठून गाडीत घेतले व गुन्हा कुठे झाला व त्याने तिला घराजवळ केव्हा सोडले ही माहिती कळणार आहे. आरोपी यादव याने कंपनीच्या संकेतस्थळावर सदर महिलेस सोडल्याचे कळवले होते व नंतर तो मथुरेला पळून गेला.
आंध्रात कारवाई
हैदराबादच्या वृत्तानुसार तेलंगण वाहतूक विभागाने हैदराबाद व सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या टॅक्सी चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. ३५ टॅक्सींवर कारवाई करण्यात आली व सात वाहने जप्त करण्यात आली असे वाहतूक व पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य प्रदेश सरकारने कॅबमध्ये जीपीएस व चालकाची पडताळणी या दोन्ही बाबी अनिवार्य केल्या आहेत.
अलेक्झांडर यांचे जाबजबाब
उबर या अमेरिकी कॅब कंपनीचे आशिया-पॅसिफिक प्रमुख एरिक अलेक्झांडर यांचे पुन्हा जाबजबाब घेण्यात आले. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशीत सहकार्य केले. गुन्हेगारी दंडसंहिता कलम ९१ अनुसार त्यांना नोटीस देण्यात आली होती.
सुनावणीस मान्यता
दरम्यान दिल्लीत कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कॅब सेवांवर नियंत्रण आणण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केले आहे.