‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी फेसबुक प्रोफाईल फोटो राष्ट्रध्वजाच्या रंगात बदलण्याची सुविधा देऊन फेसबुकने ‘इंटरनेट डॉट ओराजी’साठी पाठिंबा मिळविण्याचा हेतू छुप्या पद्धतीने साध्य करून घेतल्याचा आरोप फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने फेटाळून लावला आहे. ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाच्या पाठिंब्यासाठी फेसबुकचा प्रोफाईल फोटो तिरंगी रंगात बदलल्यास ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ या फेसबुकच्या उप्रकमालाही पाठिंबा मिळतो, हा गैरसमज असून ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाचा ‘इंटरनेट डॉट ओराजी’शी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण मार्क झकरबर्गने दिले आहे. प्रोफाईल फोटो बदलण्याच्या लिंकमधील कोडमध्ये आमच्या इंजिनिअरने चुकून ‘इंटरनेट डॉट ओराजी प्रोफाईल पिक्चर’ असे म्हटले आहे. मात्र, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ या दोन्ही संपूर्णपणे वेगवेगळ्या मोहिमा आहेत. तसेच हा कोड देखील आम्ही त्वरित बदलणार आहोत, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौऱयात फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देऊन मार्क झकरबर्गसोबतच्या संवादावेळी ‘डिजिटल इंडिया’बद्दल माहिती दिली होती. मोदींच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी झकरबर्गने पुढाकार घेऊन सर्वप्रथम स्वत:चा फेसबुक प्रोफाईल फोटो तिरंगी रंगात बदलला होता. त्यानंतर संपूर्ण भारतात फेसबुक युजर्सने ‘डिजिटल इंडिया’ला पाठिंबा देण्यासाठी आपले प्रोफाईल फोटो फेसबुकने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेनुसार तिरंगी रंगात बदलण्यास सुरूवात केली. मात्र, हे प्रोफाईल फोटो बदलताना फेसबुकने दिलेल्या लिंकमध्ये ‘इंटरनेट डॉट ओआरजी’चा समावेश असल्याचे समोर आले. त्यामुळे ‘डिजिटल इंडिया’च्या नावाखाली फेसबुकने प्रोफाईल फोटो बदलण्याच्या सुविधेच्या माध्यमातून ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ला पाठिंबा मिळविला असल्याचा आरोप करण्यात आला. फेसबुकचे ‘इंटरनेट डॉट ओराजी’ हे देशात नेट न्युट्रिलीटी या वर्गवारीत मोडणारी सुविधा आहे. इंटरनेट स्वातंत्र्यात हस्तक्षेप करणाऱया नेट न्युट्रिलीटीला नेटिझन्सचा कडाडून विरोध आहे.