भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी इंग्लंडमधील सोळा लाख भारतीयांमध्ये उत्साहाचे वारे सळसळू लागले आहे. इंग्लंडवासी भारतीयांची यंदाची दिवाळी मोदी यांच्यासमवेत साजरी करण्याचा आगळा योग लंडनवासीयांनी साधला आहे. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी लंडनमध्ये सुरू झाली आहे.

तब्बल बारा वर्षांनंतर मोदी यांच्या लंडनभेटीचा योग आला आहे. २००३ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या लंडनभेटीत येथील भारतीयांशी संवाद साधला होता. आता येत्या ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर मोदी येत आहेत. ऐन दिवाळीत भारतीय नेत्याचा सहवास लाभणार म्हणून इंग्लंडमधील तमाम भारतीय खूश आहेत. इंग्लंडमधील जवळपास १५ लाख भारतीयांच्या सुमारे ४८० संस्था-संघटना देशभर आहेत.
युरोप इंडिया फोरमच्या पुढाकाराने सुरू झालेल्या मोदी स्वागताच्या तयारीत इंग्लंडमधील एडन मित्रमंडळ, एडन वनिक समाज, गायत्री परिवार, आशियाना चॅरिटी ट्रस्ट, दादा भगवान फाऊंडेशन, असोसिएशन ऑफ इंडियन बँक्स इन लंडन, अवंती भवन ट्रस्ट, बाल भवन गुरुकुल आदी इंग्लंडमधील संस्थांनीही सहभाग घेतला आहे. भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इंग्लंड प्रवेशातील अडचणी व अन्य समस्यांना मोदी यांच्या या भेटीमुळे ब्रिटिश सरकारपुढे वाचा फुटेल असा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास वाटतो. संस्थेचे अध्यक्ष श्री. तारा मुखर्जी, महासचिव प्रवीण अमीन व अन्य पदाधिकाऱ्यांनी आज भारतातील पत्रकारांच्या एका शिष्टमंडळास मोदी यांच्या दौऱ्याची माहिती दिली.

येत्या ११ ते १३ नोव्हेंबरच्या लंडनभेटीत मोदी यांच्या जाहीर सभा लंडनच्या प्रसिद्ध वेम्बली स्टेडियमवर आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वतयारीबाबत रविवारच्या बठकीत चर्चा झाली. सुमारे ६० हजारांची क्षमता असलेल्या या स्टेडियमवरील सभेसाठी प्रवेशिका मिळाव्यात म्हणून इंग्लंडवासी भारतीयांची अक्षरश: चढाओढ सुरू असून, ६० हजार प्रवेशिकांची मागणी आत्ताच नोंदविली गेल्याने ऑनलाइन प्रवेशिका वितरण तर थांबविण्यात आले आहे.