भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावर ‘चारा चोर’ अशी टीका केली. त्याला लालूप्रसाद यांनी ‘नरभक्षी’ असे प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही नेत्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाटणा आणि जामुई येथे लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला असून त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्याचा भंग झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन यांनी वार्ताहरांना सांगितले. सचिवालय पोलीस ठाण्यात यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पाटणाचे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक विकास वैभव यांनी सांगितले.
नरभक्षी वक्तव्याबद्दल लालूप्रसाद यांच्याविरुद्ध कार्यकारी दंडाधिकारी राजीव मोहन यांच्या अहवालावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बेगुसराई येथील सभेत लालूप्रसाद यांचा उल्लेख चारा चोर केल्याबद्दल अमित शहा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना दिली.