अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना फ्रान्समध्ये सायकल चालवत असताना अपघात होऊन त्यांच्या पायाचे हाड मोडले आहे. केरी यांना तातडीने जवळच्या स्वित्र्झलडमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
इराणच्या अणुप्रश्नावर चर्चा करण्यासाठी केरी स्वित्र्झलडला गेले होते. ते राहत असलेला भाग फ्रान्सच्या भूभागाने वेढला असून सीमेपासून अगदी जवळ आहे. केरी यांना सायकलिंगची आवड असून ते फ्रान्सच्या भूभागात सायकलिंग करत होते. त्यावेळी सायकलवरून पडून त्यांच्या पायाचे हाड मोडले. त्यांचे वैद्यकीय पथक त्यांच्या सोबतच होते. केरी यांना तातडीने हेलिकॉप्टरमधून उपचारासाठी स्वित्र्झलडमधील जिनिव्हा युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून ते पुढील उपचारांसाठी अमेरिकेतील बोस्टन येथे जातील. त्यांच्या नियोजित चार देशांच्या दौऱ्यानुसार सोमवारी ते माद्रिदला जाणार होते. आता तो दौरा रद्द करण्यात येईल.