बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आता शीगेला पोहचले आहेत. गोमांस खाण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे(राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरूवारी मुंगेर येथील जाहीर सभेत समाचार घेतल्यानंतर आता नितीश कुमार यांनी मोदींच्या टीकेवर पलटवार केला आहे.

बिहार निवडणुकीला जातीय स्वरूप देण्यासाठी दादरीप्रकरणावर मोदींनी ‘मौन’ बाळगल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला आहे. गोमांस खाण्याच्या मुद्द्यावरून लालूंवर टीका करणारे मोदी आपल्या भाषणांत दादरी प्रकरणावर मात्र बोलणे टाळत आहेत, यातून मोदींचा खरा चेहरा समोर आला आहे, असे ट्विट नितीश कुमार यांनी केले आहे. बिहारच्या निवडणुकीला जातीय स्वरूप देण्याचा हा त्यांचा कट आहे, असेही ते पुढे म्हणाले.

त्याआधी मोदींनी बिहारच्या मुंगेर येथील जाहीर सभेत बोलताना ‘सैतानाला नेमका लालूंचाच पत्ता कसा काय मिळाला?’ असा खोचक सवाल उपस्थित करत लालूंवर टीका केली. ‘हिंदू समाजातच अनेकजण गोमांस खातात’, असे विधान लालूप्रसाद यांनी केले होते. याविधानावरून गदारोळ निर्माण झाला होता. बिहारमधील यादव समाज देखील लालूंच्या या वक्तव्यावर नाराज झाला. त्यामुळे लालूंनी लगेच आपल्या विधानावर सारवासारव करीत आपले विधान मागे घेतले. मला तसे म्हणायचे नव्हते. माझ्या अंगात आलेल्या सैतानाने हे विधान माझ्याकडून वधवून घेतले, अशी सारवासारव लालूंनी केली होती. हाच धागा पकडून आज मोदींनी लालूंवर शरसंधान केले. लालूंनी आपल्या विधानातून केवळ यादव समाजाचाच नाही तर, संपूर्ण बिहारचा अपमान केला आहे. लालू सत्तेत येण्यात यादव समाजाचा मोठा सहभाग आहे. मग, त्यांना दुखवून कसं चालेल म्हणून लालूंनी आपल्या विधानाचे सारे खापर सैतानावर फोडले. या सैतानाला नेमका लालूंचाच पत्ता कसा काय मिळाला?, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. एखाद्या नातेवाईकाला ओळखावे तसे लालूंनी या सैतानाला ओखळले आहे. त्यामुळे सैतानाचा वावर असलेल्या अशा व्यक्तींपासून जनतेने सावध राहायला हवे, असा सल्लाही मोदी यांनी देऊ केला.

जयप्रकाश नारायण यांच्या नावाने राजकारण करणारे आज काँग्रेससोबत आहेत. लालू आणि नितीश यांच्या सहाय्याने काँग्रेस मागच्या दाराने बिहारच्या राजकारणात प्रवेश करू पाहत आहे. जयप्रकाश नारायण यांनी ज्या पक्षाच्या विरोधात आयुष्यभर लढा दिला. त्याच काँग्रेस पक्षासोबत आज यांनी हातमिळवणी केली आहे, असा टोलाही मोदी यांनी लालूप्रसाद आणि नितीश कुमार यांना लगावला.