नासाच्या क्युरिऑसिटी या रोव्हर गाडीने मंगळावरील एक मोठे धुळीचे वादळ हवामान केंद्रातील संवेदकांच्या मदतीने टिपले आहे. मंगळावरील या वादळाने तेथील वातावरणात अनेक बदल झाले आहेत. मंगळावरील हे वादळ प्रथम नासाच्या मार्स रेकनसान्स ऑरबायटर (एमआरओ) यानाने १० नोव्हेंबरला टिपले होते व नंतर त्याचा मागही ठेवला होता असे नासाने म्हटले आहे.
 ऑरबायटरवरील रंगीत प्रतिमायंत्राच्या मदतीने या वादळाचे निरीक्षण केले असून त्याची माहिती नासाच्या अ‍ॅपॉरच्युनिटी या गाडीचे नियंत्रण करणाऱ्या वैज्ञानिकांना मिळाली आहे. हे वादळ अ‍ॅपॉरच्युनिटी या गाडीपासून १३४७ कि.मी अंतरावर होते, त्यामुळे तेथील परिसरात बराच धुरळा असल्याने अंधूक दिसत होते. अ‍ॅपॉरच्युनिटी या गाडीवर हवामान केंद्र नाही. क्युरिऑसिटीच्या हवामान केंद्राने मात्र वादळामुळे वातावरणात झालेले बदल टिपले आहेत. या गाडीवरील एनव्हिरॉनमेंटल मॉनिटरिंग स्टेशनच्या संवेदकांनी हवेचा कमी झालेला दाब मोजला व रात्रीचे कमी झालेले तपमानही नोंदले आहे. हे संवेदक स्पेनने दिले होते. नासाच्या पॅसाडेना येथील जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचे मंगळ संशोधक रिच झुरेक यांनी सांगितले, की हे एका प्रदेशातील वादळ आहे त्याने बराच मोठा भाग व्यापला असून यापूर्वीही तेथे अशी धुळीची वादळे निर्माण झाली होती.
१९७० च्या व्हायकिंग मोहिमेनंतर प्रथमच एखादे यान कक्षेत असताना मंगळावरील वादळाचा वेध घेतला जात आहे. क्युरिऑसिटीचे विषुववृत्तीय स्थान, हवामान केंद्रातील संवेदक व मार्स रेकनसान्स ऑरबायटरकडून रोज दिला जाणारा आढावा यामुळे तेथील वादळाबाबत व्हायकिंग मोहिमेपेक्षा जास्त चांगली माहिती या वेळी मिळत आहे.
मंगळावरचे वर्ष हे पृथ्वीच्या दोन वर्षांइतके असते. २००१ व २००७ मध्ये तेथे जी वादळे झाली त्याचा फार मोठा परिणाम झाला पण त्यानंतरच्या वादळांचा तसा परिणाम झाला नाही. मंगळावरील काही वादळे एका विशिष्ट आकारानंतर वाढत नाहीत तर काही वादळे मात्र आकाराने वाढतच जातात याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.