पाकिस्तानच्या सैनिकांनी गेल्या २४ तासांत शस्त्रसंधीचे दोनदा उल्लंघन केले आणि नागरी वस्त्या आणि भारतीय ठाण्यांवर तोफगोळ्यांचा मारा केला. पूंछ जिल्ह्य़ात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर करण्यात आलेल्या या हल्ल्यास भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.पाकिस्तानने सलग नवव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ऑगस्ट महिन्यांत ४० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून भारत-पाकिस्तान सीमेवर या वर्षी २३० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
पूंछ जिल्ह्य़ातील सौजियान आणि मंडी क्षेत्रात पाकिस्तानच्या सैनिकांनी १२० मि.मी. आणि ८० मि.मी.च्या तोफगोळ्यांनी आणि मशीनगनच्या साहाय्याने हल्ला चढविला, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते (जम्मू) कर्नल. मनीष मेहता यांनी सांगितले. भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात दोन दिवसांत सहा जणांचा बळी गेला. १५ आणि १६ ऑगस्टदरम्यान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारताने रविवारी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पाचारण करून तीव्र निषेध नोंदविला आहे.