मराठवाडा आणि राज्याच्या अन्य भागातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारच्या सूचना मागवून घेऊन तीन-चार दिवसांत दुष्काळावरील उपाययोजनांचे धोरण ठरविण्यात येईल, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले. जालना जिल्हय़ातील रुई गावात शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. देशात पडणाऱ्या दुष्काळाच्या संदर्भात उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधानांनी आपल्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीमध्ये अर्थमंत्री, गृहमंत्री, ऊर्जामंत्री त्याचप्रमाणे आणखी दोन-तीन केंद्रीय मंत्री आहेत. या समितीस मंत्रिमंडळाशिवाय काही निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असे पवार यांनी सांगतिले.
पवार यांनी रविवारी जालना जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रुई गावच्या परिसरातील रोजगार हमी कामास भेट दिली. त्याचप्रमाणे पाण्याअभावी सुकलेले मोसंबी बागांची तसेच उसाच्या पिकांची पाहणी केली. रुई येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, की मराठवाडय़ातील जालना, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद त्याचप्रमाणे अहमदनगर, सोलापूर, पुणे, सांगली जिल्हय़ातील दुष्काळी तालुक्यात गंभीर स्थिती आहे. या वेळच्या दुष्काळात धान्य कमी नाही. परंतु पाण्याचा प्रश्न आहे. १९७२च्या दुष्काळात पाण्याचा प्रश्न नव्हता. परंतु धान्य परदेशातून आणावे लागले होते. रोजगार हमी कामास भेट दिली असताना तेथे कामावरील काही महिलांनी दरमहा मिळणारे ३५ किलो धान्य वाढवून द्यायला सांगू, कारण धान्याचे उत्पादन वाढल्यामुळे ते ठेवायला जागा नाही!
राज्यातील क्रमांक दोनच्या जायकवाडी आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उजनी धरणात पाणी नाही. सध्या पाणी ही सर्वात मोठा प्रश्न आहे. राज्यात जालना जिल्हय़ाची अवस्था सर्वात गंभीर असल्याने त्यासंदर्भात काही करावे, असे आपण राज्य सरकारला सांगितले असल्याची त्यांनी स्पष्ट केले.
मुंडेंचा आरोप पोरकटपणाचा
आपणास फक्त पश्चिम महाराष्ट्राचाच दुष्काळ दिसतो हे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे विधान पोरकटपणाचे असल्याची टीका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केली.
जालना जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थितीविषयी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, मी काही केवळ बीड जिल्ह्य़ाचा नेता नाही. मला देश पातळीवर विचार करावा लागतो. सौराष्ट्र, उत्तर कर्नाटक इत्यादी भागात दुष्काळी परिस्थितीच्या निमित्ताने मी जाऊन आलो आहे.पश्चिम महाराष्ट्रात माझे घर असल्याने तेथेही मला जावे लागते. मला स्वत:च्या घरी जायची सवय आहे, असा टोलाही पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या मुंडे यांना लगावला.