विरोधक आक्रमक राज्य थंडीमुक्त करण्याची शिवसेनेचीही मागणी
भाजपने मात्र आरोप फेटाळले
मुंबई, दि. २६ (आमच्या खास, विशेष व आतील गोटांतील बातमीदारांकडून) :
गेल्या काही दिवसांत थंडी मोठय़ा प्रमाणावर वाढली असून, मुंबईत तर थंडीवाढीने गेल्या ६६ वर्षांतील विक्रम मोडला आहे. त्यामुळे राज्यभरातील जनतेमध्ये सरकारविरोधात थंडसंतापाची लाट पसरली असून, येत्या काही दिवसांत थंडीवाढ कमी न झाल्यास सरकारविरोधात मफलर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज येथे बोलताना दिला. पत्रकारांना स्वेटरवाटप कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने यासंदर्भात आणखी एक हिवाळी अधिवेशन बोलावून विरोधी आमदारांना कामकाज चालू न देण्याची संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तर राज्यात थंडीवाढ झालेली असताना खुद्द मंत्रालयात अनेक मंत्र्यांच्या दालनातील एसी सुरू असतात, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एका स्वतंत्र पत्रकार परिषदेत केला. त्याबाबतच्या गुप्त ध्वनिचित्रफिती आपण वेळ येताच सभागृहासमोर आणू, असेही त्यांनी सांगितले.
भाजपने मात्र या सर्व आरोपांचा इन्कार केला असून, शरद पवार यांच्या धोरणांमुळेच राज्यात थंडीवाढ झाली असल्याचा आरोप केला आहे.
आज मुंबईतसुद्धा मोठय़ा प्रमाणावर थंडीवाढ झालेली आहे. असे असताना फडणवीस सरकार सूडाचे राजकारण करीत आहे, असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला. थंडीवाढीच्या काळात राहत्या घरांवर टाच आणणे हे कोणत्या कायद्यात बसते? शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात थंडीवाढ करून येथे कानटोपीचा विचार पसरविण्याचे कारस्थान केले जात आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवताना- हेच का तुमचे अच्छे दिन?, असा गंभीर सवाल केला. ते म्हणाले की, ‘कब तक सहोगे सर्दी की मार, अब की बार मोदी सरकार’ अशा घोषणा हे सरकार विसरलेले दिसते. शेतकरी, कष्टकरी आज वाढत्या थंडीमुळे हैराण झाला आहे. अनेकांना सर्दी झालेली आहे. मात्र, सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये साधी बाम लावून देण्याची सोय अद्याप करण्यात आलेली नाही. जनतेला साधा बामही न देणारे हे बदनाम सरकार आहे. या सरकारने घरटी एक शेकोटी मंजूर केली पाहिजे. तसेच शेकोटय़ांत जाळण्याकरिता वैरणछावण्या उभारल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे हे आरोप हास्यास्पद असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील थंडीवाढीमुळे ‘मेक इन् महाराष्ट्र’ उपक्रमाला मोठीच चालना मिळणार आहे. गेल्या काही दिवसांत युरोपातील अनेक देशांमधून थेट विदेशी गुंतवणुकीचे काही प्रस्ताव आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होत असलेली राज्याची ही प्रगती सहन न होणाऱ्या शक्तीच थंडीवाढीची कोल्हेकुई करीत आहेत.
सरकारच्या वतीने बोलताना मंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, थंडीवाढ हे विरोधकांचे कुभांड आहे. काँग्रेसने गेल्या ६७ वर्षांत केलेली पापे झाकण्यासाठी आज थंडीवाढीचा मुद्दा उकरून काढण्यात येत आहे. यापूर्वी राज्यात झालेल्या थंडीवाढीने येथील हजारो निरपराध नागरिकांना सर्दीचा सामना करावा लागला होता हे काँग्रेसच्या मफलरबाज नेत्यांनी विसरू नये. थंडीच्या संदर्भात लवकरच राज्यात नवे शैक्षणिक धोरण आखण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. या धोरणात कलचाचणीचा समावेश असेल की काय, यावर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. का, ते समजू शकले नाही.
सरकारच्या वतीने बोलताना मंत्री एकनाथ खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रात काही प्रमाणात थंडीवाढ झाली असून विदर्भ व मराठवाडय़ात गारठासदृश परिस्थिती असल्याचे मान्य केले. मात्र, याला शरद पवार कारणीभूत असल्याची आपली माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सध्या दारूबंदी शक्य नसल्याचे आपण म्हणालो तेव्हा अनेकांनी त्यावर टीका केली. त्या निर्णयामागील कारणे आणि त्याची उपयुक्तता आज थंडीवाढीच्या काळात लोकांना समजली असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
सरकारच्या वतीने बोलताना मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले की, राज्यातील थंडीवाढ नियंत्रणात आहे. काही ठिकाणी कृत्रिम थंडीवाढ झाली असून, त्यामागे असलेल्या कानटोपी, स्वेटर आणि मफलर व्यापाऱ्यांची पाळेमुळे खणून काढल्याशिवाय आपण राहणार नाही, अशी गर्जनाही त्यांनी केली. या व्यापारी व विक्रेत्यांवर लवकरच छापे टाकण्यात येतील. तशी माहिती त्यांना देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
सरकारच्या वतीने बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, थंडी परंपरेने पडत असल्याने लोकांनी तिला विरोध करण्याचे कारण नाही. आपल्या म्हणण्याचा माध्यमांनी विपर्यास केला असा खुलासा उद्या करावा, असे आवाहनही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना यावेळी केले.
तर सरकारच्या वतीने विरोधात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्याला थंडीमुक्त करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, शिवरायांच्या या महाराष्ट्रात अमितशाहीमुळेच थंडीची लाट आलेली आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक वारे पाठविण्यात येत असल्याची आमची माहिती आहे. परंतु आमचे शिवसैनिक हे मर्दाचे बच्चे आहेत. आमची मनगटे नुसतीच नाक पुसण्यासाठी नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा देऊन ते पुढे म्हणाले की, आपण थंडीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी येत्या मे महिन्यात राज्यातील थंडीग्रस्त भागाचा दौरा करणार आहोत. थंडीच्या काळात एकाही गल्लीतील, आळीतील आणि रस्त्यावरील शेकोटी विझणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी हवे तितके टायर शिवसेनेकडून पुरविले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
एकंदर येत्या काळात थंडीवाढीमुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी राजकीय गोटांच्या हवाल्याने सांगितले.
अप्पा बळवंत
balwantappa@gmail,com
आणखी एक बातमी : खास लोकाग्रहास्तव ‘ध चा मा’ या सदरास पुढील वर्षी विश्रांती देण्यात येत आहे.