आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हा रुग्णालयांपासून सर्व रुग्णालयांमध्ये  असणारी तज्ज्ञांची कमतरता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आपल्याच रुग्णालयांमध्ये ‘कॉलेज ऑफ फिजिशियन्स अ‍ॅण्ड सर्जन’मुंबई या संस्थेच्या माध्यमातून पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील वर्षी ऑगस्टपासून युरॉलॉजी व मेडिसिन या दोन विषयात ‘डीएनबी’ हा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमही सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
ग्रामीण तसेच प्रामुख्याने दुर्गम आदिवासी विभागात विशेषज्ञ डॉक्टर्स जाण्यास तयार नसतात. यातून अनेक गुंतागुंतीच्या आजार अथवा शस्त्रक्रियांसाठी डॉक्टर उपलब्ध न झाल्यामुळे अनेकदा रुग्णांचा मृत्यू होतो. शासनाकडून वैद्यकीय उपकरणांपासून औषधांपर्यंत सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याची तयारी असली तरी तज्ज्ञ डॉक्टरांअभावी उपचार कसा करणार हा प्रश्न आरोग्य विभागापुढे निर्माण झाला होता. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पुढाकार घेऊन ‘सीपीएस’चे पदविका अभ्यासक्रम आरोग्य विभागाच्या रुग्णालयात सुरु करण्याची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडली. मुख्यमंत्र्यांनीही या योजनेचे स्वागत केले असून मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ‘सीपीएस’चा अभ्यासक्रम राबविण्याला मान्यता देण्यात आली.
 या योजनेमुळे आरोग्य विभागात काम करणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना पदविका अभ्यासक्रमाची मोठी संधी उपलब्ध झाली असून एकूण ३१२ अधिकारी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकणार आहेत. मेडिसिन अ‍ॅण्ड सर्जरी, गायनॅकॉलॉजी अ‍ॅण्ड ऑबस्टेट्रीक्स, चाईल्ड हेल्थ, पॅथॉलॉजी, अ‍ॅनेस्थेशिया, सायकेट्रीक मेडिसिन, टय़ुबरक्युलॉसीस तसेच ट्रान्सफ्युजन मेडिसिन या विषयांमध्ये पदविका अभ्यास करता येणार असून दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. ‘सीपीएस’ मधून पदविका घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना किमान पाच वर्षे शासकीय सेवा करणे बंधनकारक असून सेवेअंतर्गतच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच खासगी विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात येणार असल्यामुळे जिल्हा रुग्णालये व ग्रामीण भागामध्ये पुरेसे विशेषज्ञ उपलब्ध होऊ शकतील असेही आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.