मुंबई महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या शिक्षण विभागाच्या २६६० कोटी ४४ लाख रुपयांच्या, २ कोटी १० लाख रुपये शिलकीच्या २०१४-१५ वर्षांच्या अर्थसंकल्पाला शिक्षण समितीने शनिवारी मंजुरी दिली. शाळांच्या इमारतींवर मोबाइल टॉवर उभारण्यास बंदी करण्यात आली असून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांवर तीन महिन्यांमध्ये नियुक्ती करण्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली.
 शाळांच्या इमारतींवर मोबाइल टॉवर उभारायचे नाहीत, पालिका आणि खासगी शाळांमधून होणारी गळती रोखण्यासाठी यावर्षीपासून ‘चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टिम’ योजना राबविण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच शाळांमध्ये लागणारे डेस्क आणि बेंचची संख्या २५०० वरुन ७५०० करण्यात आली. उशीरा येणाऱ्या शिक्षकांवर अंकुश ठेवण्यासाठी शाळेत सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, शिक्षकांना इतर कामांना जुंपल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. त्यामुळे शिक्षकांना ज्ञानदानाचेच कायी करू द्यावे, अशी मागणी भाजप नगरसेवक विनोद शेलार, विठ्ठल खरटमोल, यामिनी जाधव यांनी यावेळी केली.
शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे येत्या तीन महिन्यांमध्ये भरण्यात येतील. तसेच शिक्षकांना योग्य तेच काम दिले जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी दिले.