विद्यापीठाचे अधिकृत पुस्तक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचा नेहमीचा गोंधळ प्राणिशास्त्राच्या ‘इकॉलॉजी अँड वाइल्डलाइफ मॅनेजमेंट’ (परिसर्ग आणि वन्यजीव व्यवस्थापन) या विषयात तरी उडणार नाही. मुंबई विद्यापीठाने इतिहासात प्रथमच नियमित विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे पुस्तक प्रकाशित केले आहे.

विविध अभ्यासक्रमांमधील विषयांसाठी खासगी प्रकाशनाची पाठय़पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. यातील प्रत्येक महाविद्यालय वेगवेगळय़ा लेखकांच्या पुस्तकांना प्राधान्य देतात. यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना समान माहिती आणि शिक्षण मिळत नाही. यावर तोडगा म्हणून विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाने स्वत:चे पाठय़पुस्तक काढण्याचा निर्णय घेतला. यानुसार विद्यापीठाच्या पहिल्या पुस्तकाची निर्मिती झाली आणि शनिवारी दादर येथील कीर्ती महाविद्यालयात त्याचे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे लेखन डॉ. विनायक दळवी, डॉ. स्मिता दुर्वे, डॉ. अकबर दळवी, डॉ. मीनाक्षी सुंदरसन यांनी केले आहे.

प्रकाशनावेळी पुस्तकाच्या ‘लेखक समिती’चे निमंत्रक डॉ. विनायक दळवी म्हणाले की, ‘विद्यापीठाच्या इतिहासात अशा प्रकारचा हा पहिला प्रयत्न आहे. विद्यापीठ स्तरावर शिक्षक-विद्यार्थ्यांकडून संशोधन सुरू असते. त्यातून संबंधित विषयात ज्ञाननिर्मिती होत असते. त्यामुळेच हे पाठय़पुस्तक तयार करण्यासाठी पन्नासपेक्षा जास्त शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे सल्ले, कल्पना यांचा आधार घेतला आहे. या पाठय़पुस्तकांच्या निर्मितीमुळे विद्यापीठ स्तरावर अभ्याससाहित्यात एकसंधता येईल. ‘ऑक्सफर्ड’, ‘केंब्रिज’ अशा जगप्रसिद्ध विद्यापीठांकडून विविध विषयांच्या दर्जेदार अभ्याससाहित्याची निर्मिती केली जाते. अशा विद्यापीठांची पुस्तके जगभरचे विद्यार्थी, संशोधक अभ्यासत असतात. या पाश्र्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून स्वतंत्र पाठय़पुस्तक निर्मितीच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल आश्वासक आहे, असेही दळवी म्हणाले.

या अभ्यास समितीने विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षांच्या दोन्ही सत्रांसाठी विद्यापीठातर्फे एकूण आठ पाठय़पुस्तकांची निर्मिती केली आहे. या वेळी विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागा’च्या संचालक डॉ. मनाली लोंढे, ‘कीर्ती महाविद्यालया’चे प्राचार्य डॉ. व्ही. एन. मगरे उपस्थित होते. प्राणिशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाने सुरू केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या फायद्याचा असल्याचे मत डॉ. लोंढे यांनी व्यक्त केले.

 

इतर विषयाच्या अभ्यास मंडळांनीही अशा प्रकारे पुढाकार घेऊन पुस्तक निर्मिती केली तर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नक्कीच फायदा होईल आणि अभ्यासात एकसारखेपणा येईल

-डॉ. मनाली लोंढे,

विद्यार्थी कल्याण विभाग संचालक