इचलकरंजी येथील यंत्रमागधारकांचे आंदोलन राजकीय वळणावर पोहोचल्याचे शनिवारी दिसून आले. राजकारणामुळेच या उद्योगाची वाट लागली आहे, असे खडे बोल आमदार सुरेश हाळवणकर यांनी आंदोलनकर्त्यांना सुनावले. तथापि त्यास प्रतिसाद न देता आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवल्याने हाळवणकर यांना निराश होऊन परतावे लागले. वस्त्रोद्योगातील समस्यांबाबत लक्षवेधी मांडली असून त्यावर मंगळवारी विधानसभेमध्ये चर्चा होऊन यंत्रमागधारकांना कर्जाच्या व्याज दरात सवलत व सवलतीच्या दरात वीज हे मुद्दे प्रामुख्याने सोडविले जातील, अशी ग्वाही हाळवणकर यांनी  देतानाच यंत्रमाग व्यवसायामध्ये कोणतेही राजकारण करू नका, असे आवाहन केले.

येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर गत चार दिवसांपासून यंत्रमागधारकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनास शनिवारी आमदार हाळवणकर यांनी भेट दिली. त्या वेळी यंत्रमागधारकांकडून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर ते म्हणाले, शासनाकडून उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्याप्रमाणे सवलतीचे वीजदर मिळण्याबरोबरच कर्जावर व्याजदरात सवलत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे यंत्रमाग महामंडळामार्फत इचलकरंजीत दोन हजार मागांवर कापड उत्पादनाचा कार्यक्रम राबविला जाईल. ज्यामुळे बाजारामधील यंत्रमाग कापड मजुरीमध्ये घट होणार नाही. तसेच शहरामधील कापड ट्रेडिंगधारकांनी खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना किमान एक पाळी चालेल अशी सूत व बिमे द्यावीत. त्याचबरोबर यंत्रमागधारकांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन हाळवणकर यांनी केले. पण त्यास नकार मिळाला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळी जमून यंत्रमागधारकांना आंदोलन सुरू ठेवण्याबाबत योग्य तो निर्णय द्यावा, असे आवाहन जीवन बरगे यांनी केले आहे. शनिवारी दिवसभरात माजी आमदार राजीव आवळे, तृप्ती देसाई, नगरसेवक अब्राहम आवळे, सायिझग असोशिएशनचे वसंत पाटील, सुरेश मांगलेकर, दिलीप ढोकळे, राजगोंडा पाटील आदींसह विविध मान्यवरांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.