पन्हाळ्यालगतच्या मसाई पठारावर ‘द लिजंड ऑफ पद्मावती’ या बहुचíचत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना मध्यरात्री या चित्रपटाचा सेट जाळण्यात आला. सुमारे ५० जणांच्या अज्ञात जमावाने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आगीत कोणालाही दुखापत झाली नसली तरी तेथे बांधण्यात आलेल्या काही घोड्यांना आगीची झळ  बसून ते जखमी झाले आहेत. यापूर्वी राजस्थानमध्येही या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी वाद झाला होता.

राजस्थानातील राणी पद्मावतीच्या चरित्रावर आधारित या चित्रपटाचे पन्हाळा गडाशेजारी मसाई पठार येथे चित्रीकरण सुरु आहे. दिग्दर्शक निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या या बहुचíचत िहदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी येथे मोठा लवाजमा दाखल झाला आहे. यासाठी मोटय़ा सेटची उभारणीही केलेली आहे. मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास या सेटला आग लावण्याची घटना घडली. पेट्रोलचे बोळे टाकून आग लावण्यात आली. ५० जणांच्या जमावाने हे कृत्य केल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. या आगीत वेशभूषा साहित्य, तंबू, लाकडी साहित्य जळून खाक झाले.

चित्रीकरणासाठी आलेले कलाकार, कर्मचारी तसेच शेजारच्या म्हाळुंगे गावातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी मदत केली. सुमारे तीन तासाहून अधिक काळ आग धुमसत होती. चित्रीकरणासाठी इथे आणलेल्या काही घोडय़ांनाही या आगीची झळ बसून ते भाजले आहेत.  चित्रीकरणासाठी आणलेले विविध प्रकारचे साहित्य, कपडे या आगीत भस्मसात झाले.

हल्लेखोरांनी या वेळी चित्रीकरणासाठी आलेल्यांच्या वाहनांवरही दगडफेक केली. हे सर्व नुकसान काही लाखांत असल्याचे बोलले जात आहे. पन्हाळा पोलीस ठाण्यात बुधवारी या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांना या घटनेविषयी अद्याप ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत.

कोल्हापूर चित्रसृष्टीला धक्का

कोल्हापूर  : मसाई पठारावर ‘द लिजंड ऑफ पद्मावती’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना मध्यरात्री सेट जाळण्यात आल्याने कलानगरी कोल्हापूरच्या चित्रसृष्टीला याचा मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुरात हदी चित्रपटांच्या चित्रीकरणाला बाळसे येईल असे आशादायक चित्र निर्माण होत असताना हा घाला बसला आहे, तर दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवली जात असल्याचे दिसल्याने या प्रकारावर खरमरीत भावना येथील चित्रपटसृष्टीत व्यक्त होत आहेत.

कलानगरी कोल्हापुरात चित्रपटाची मुळे खोलवर रुजली आहेत. हदी-मराठी चित्रपटाचा समृद्ध इतिहास या परिसरात निर्माण झाला आहे. अलीकडे चित्रपट-मालिका यांच्या चित्रीकरणामुळे कलाकार, तंत्रज्ञ, निर्माता, दिग्दर्शक अशा सर्व घटकांत आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. चित्रपटांसाठी आवश्यक असणारे सारे पोषक वातावरण कोल्हापूर परिसरात आहे. यामुळे हा भाग मराठी चित्रपट-मालिका यांच्यापुरता मर्यादीत राहू नये, अशा भावना अनेकदा बोलून दाखवल्या जात होत्या. विशेषत: बिग बजेटचे िहदी चित्रपट इथे तयार व्हावेत असे चित्रपट जगतातून बोलून दाखवले जात असे.  ‘द लिजंड ऑफ पद्मावती’ या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर भागात होणार असल्याच्या घटनेने आनंददायी चित्र निर्माण झाले होते. संजय लीला भन्साळी हे बॉलिवूडमधील बडे प्रस्थ. गुजारीश, ब्लॅक, देवदास, बाजीराव मस्तानी अशा जबरदस्त, भव्यदिव्य कलाकृती निर्माण करणाऱ्या भन्साळी यांनी ‘द लिजंड ऑफ पद्मावती’ या चित्रपटाची निर्मिती सुरू केली.

पण चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याच्या  भावनेतून चित्रपटाच्या राजस्थानमधील चित्रीकरणाला काही समाज संघटनांनी विरोध करत त्यांना मारहाण केली. त्यामुळे त्यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरात करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण येथेही दुर्दैवाने त्यांची पाठ सोडली नाही.  मसाई पठारावर ‘पद्मावती’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. मंगळवारी मध्यरात्री जमावाने सेटची जाळपोळ केली.  भन्साळी यांनी कोल्हापुरात चित्रीकरण करावे यासाठी आपण बरेच प्रयत्न केले, पण सेट जाळण्याच्या प्रकाराने व्यथित झाल्याचे चित्रपटाचे ‘लाइन प्रोडय़ुसर’  मििलद अष्टेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ते कोल्हापूरचे. इथे िहदी चित्रपटाचे चित्रीकरण व्हावे यासाठी प्रयत्नशील असलेले मराठी चित्रपट महामंडळाचे संचालकही या प्रकाराने व्यथित झाले आहेत. या चित्रीकरणात स्थानिक २०० लोकांचाही सहभाग आहे. या मंडळींनाही या घटनेमुळे धक्का बसला आहे.  कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विध्वंस करण्यापूर्वी इतिहास नीट समजून घ्यावा. कलाकृती आकाराला आल्यावर ती चांगली की वाईट यावर बोलावे, पण वाढती विध्वंसक प्रवृत्ती चुकीची आहे.