अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बँकांनी विना व्याज कर्जपुरवठा करावा. यासाठी बँकांकडे धनिकांनी विना व्याज ठेव ठेवून सहकार्य करावे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे १ हजार कोटी रुपयांचा वित्त पुरवठा केला जावा, अशी अपेक्षा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली.

पुणे येथील जनता सहकारी बँकेमध्ये इचलकरंजी येथील चौंडेश्वरी सहकारी बँकेच्या विलीनीकरणाचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. इचलकरंजीतील नाटय़गृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी मंत्री पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांना विना व्याज अर्थसहाय्याची संकल्पना स्पष्ट करताना मंत्री पाटील म्हणाले, दरवर्षी शेतकऱ्यांना एक वर्षांच्या कालावधीसाठी पीक कर्ज मिळत असते. दुष्काळ, अवकाळी पाऊस, महापूर अशा कारणांमुळे एखाददुसऱ्या वर्षी पीक हातचे जाऊन शेतकऱ्यांना कर्जफेड करता येत नाही. असा शेतकरी कर्जाच्या दृष्टचक्रात अडकून पडतो. यासाठी त्याला किमान ५-७ वर्षांच्या मुदतीसाठी विनाव्याज कर्ज बँकांनी पुरवले पाहिजे. त्यासाठी धनिक ठेवीदारांकडून विनाव्याजाच्या ठेवी बँकांनी मिळवण्यास सुरुवात करावी. एका दिवसात १०० कोटीच्या ठेवी जमवणाऱ्या जनता बँकेने याकामी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

राज्यात अनेक सहकारी बँका अडचणीत येत असून शक्य तितक्या बँकांचे विलीनीकरण जनता बँकेने करून घ्यावे. यासाठी सहकार विभागाकडून मदत केली जाईल, असे आश्वासन देऊन सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, यामुळे सहकार क्षेत्राबद्दल निर्माण झालेला गरविश्वास दूर होऊन विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. सहकार आíथकदृष्टय़ा संपन्न झाला तर राज्य आíथकदृष्टय़ा संपन्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी इचलकरंजी जनता बँकेची स्थापना होण्यामागे पुणे जनता सहकारी बँकेची प्रेरणा असल्याचा अवर्जुन उल्लेख केला. बँकेचे अध्यक्ष अरिवद खळदकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

बँकेवर विश्वास.. राजकारण्यांवर अविश्वास

राजकीय क्षेत्रातील लोकांबद्दल निर्माण झालेल्या जनमताचा नेमका दाखला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला. ते म्हणाले, जनता सहकारी बँकेने अनेकदा अडचणीवर मात करून प्रगती साध्य केली आहे. लोक बँकेवर विश्वास ठेवतात पण राजकारण्यांवर नाही. समोर असताना राजकारण्यांना लोक चांगले बोलतात पण आतून मात्र त्यांनीच वाट लावली, अशा शब्दात चिड व्यक्त करतात. यामुळे विश्वासार्ह जनता बँकेसोबत राहायची अधिक संधी मिळाली तर माझ्यात वाण नाही गुण लागला म्हणून सुधारणा तरी होईल, अशी टिपण्णी केल्यावर सभागृहात हंशा पसरला.