दोन महिन्यांपूर्वी पोलीस दलामध्ये भरती झालेल्या तरुणीने वडिलांच्या व्यसनाच्या काळजीने मानसिक तणावाखाली येऊन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कळंबा (ता. करवीर) येथील दत्तोबा शिंदे नगरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. वसुंधरा रंगराव पाटील (वय २०, रा. सडोली खालसा, ता. करवीर) असे तिचे नाव आहे.

वसुंधरा पाटील ही आपल्या आई, वडील व भावासोबत सडोली खालसा येथे राहण्यास आहेत. दोन महिन्यांपूर्वी वसुंधराची नियुक्ती कोल्हापूर पोलीस दलात झाली, मात्र ती रुजू झाली नव्हती. गेल्या १५ दिवसांपासून वसुंधरा प्रचंड मानसिक दबावाखाली होती. याबाबत तिला विचारले असता वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे दबाव आल्याचे चुलते बळीराम पाटील यांना सांगितले होते. यामुळे बळीराम पाटील यांनी वसुंधराला कळंबा येथील आपल्या घरी आणले होते. शुक्रवारी सकाळी बळीराम व वसुंधरा प्रभातफेरी करून ८ वाजता घरी परतले. यानंतर अंघोळ व नाश्ता आटोपून वसुंधरा घराच्या वरच्या मजल्यावर गेली. ९.३० वाजून गेले तरी वसुंधरा खाली न परतल्याने बळीराम यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यामुळे दरवाजा तोडून आत पाहिले असता वसुंधराने छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यानंतर तत्काळ या घटनेची माहिती करवीर पोलिसांना देण्यात आली. सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.