एबी डी’व्हिलियर्सचे दमदार नाबाद शतक
रोहित शर्माचे दीडशतक व्यर्थ
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आल्यापासून भारताचा पिच्छा पराभवच पुरवताना दिसत आहे. डी’व्हिलियर्सने अखेरच्या चेंडूवर झळकावलेल्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३०३ धावा उभारल्या. डी’व्हिलियर्सने या वेळी ७३ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ६ षटकार लगावत नाबाद १०३ धावांची दमदार खेळी साकारली. आफ्रिकेच्या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी रचून संघाला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. रोहितने १३३ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर १५० धावांची खेळी साकारली, तर अजिंक्यने ६० धावा केल्या. पण या दोघांना वगळता एकाही फलंदाजाला समर्थपणे फलंदाजी करता न आल्याने अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या उत्कंठावर्धक सामन्यामध्ये भारताला पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

भारताच्या पराभवाचे पंचक
१ एबी डी’व्हिलियर्सने आफ्रिकेला स्थैर्य मिळवून देत कर्णधाराला साजेशी साकारलेली नाबाद शतकी खेळी
२ रोहित आणि अजिंक्य यांच्यानंतर भारताकडून एकही मोठी भागीदारी पाहायला मिळाली नाही.
३ अजिंक्य आणि रोहित हे मोक्याच्या क्षणी बाद झाले.
४ सर्वोत्तम ‘फिनिशर’ असेलला धोनी भारताला जिंकवून देण्यात नापास ठरला.
५ युवा गोलंदाज कागिसो रबाडाने अखेरच्या षटकात टिच्चून मारा करत धोनी आणि स्टुअर्ट बिन्नी यांची विकेट मिळवली.