ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील काही निर्णय भारताच्या विरोधात गेले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पंच पुनर्आढावा प्रक्रिया (डीआरएस) या तांत्रिक पद्धतीच्या विरोधात आहे. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांतील पराभवांनंतर डीआरएसची चर्चा पुन्हा ऐरणीवर आहे. या पाश्र्वभूमीवर डीआरएसचा आहे त्या स्थितीत स्वीकार करावा, अन्यथा त्याचे परिणाम भोगा, असा इशारा भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंकडून देण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने पत्करलेल्या दोन कसोटी सामन्यांतील दारुण पराभवांतील पंचांच्या किमान पाच निर्णयांचा पुनर्आढावा घेता आला असता. परंतु भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही डीआरएसवर अद्याप विश्वास निर्माण झालेला नाही.
‘‘आता भारताने डीआरएस स्वीकारण्याची वेळ आली आहे. दोन्ही कसोटी सामन्यांत भारताने चांगली लढत दिली. परंतु निर्णायक क्षणी चुकीचे निर्णय दिले गेले,’’ असे अनुभवी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगने सांगितले.

‘‘पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात शिखर धवनला यष्टीपाठी झेलबाद देण्यात आले. चेतेश्वर पुजाराला दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात यष्टीपाठी झेलबाद देण्यात आले. याचप्रमाणे रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांचे ब्रिस्बेनच्या दुसऱ्या डावातील निर्णय वादग्रस्त होते. हे निर्णय डीआरएस असता, तर भारतासाठी कदाचित अनुकूल ठरले असते,’’ असे हरभजनने पुढे सांगितले.
भारताचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने सांगितले की, ‘‘अचूक निर्णय देणाऱ्या कोणत्याही तांत्रिक व्यवस्थेचे नक्कीच स्वागत आहे. माझा डीआरएसला विरोध नाही. परंतु सध्याची प्रक्रिया ही विश्वसनीय नाही. हॉटस्पॉट किंवा हॉकआय यांची अचूकता शंकास्पद आहे.’’
भारताचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर म्हणाला की, ‘‘डीआरएस हे १०० टक्के अचूक नाही, असे माझे मत आहे. परंतु आपण तंत्रज्ञानाच्या सोबत जायला हवे. अनेक सोपे निर्णय आपल्या विरोधात जात आहेत आणि त्याचा मालिकेवरील परिणाम आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आपण डीआरएस स्वीकारायला हवे.’’
भारताचे माजी सलामीवीर चेतन चौहान म्हणाले की, ‘‘क्रिकेट हा असा खेळ आहे की, ज्यात एका खराब निर्णयामुळे सामन्याचे चित्र पालटू शकते. महत्त्वाच्या क्षणी पंचांच्या त्रुटीपूर्ण निकालामुळे तुम्ही सामना गमावू नये. मी प्रारंभीपासूनच डीआरएसचा चाहता आहे. सध्याच्या स्थितीत त्याचा स्वीकार व्हायला हवा. तांत्रिक समिती त्याची अचूकता वाढवण्यासाठी अभ्यास करीतच असेल.’’