अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली सुरुवात केली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलेल्या परुपल्ली कश्यपने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कोरियाच्या ली ह्यूनला पराभवाचा धक्का दिला आहे. २१-१६, १०-२१, २१-१९ अशा सेटमध्ये पराभव करत कश्यपने ह्यूनला चकीत केलं. या विजयासाठी कश्यपला चांगलीच मेहनत करावी लागली. तब्बल १ तास ३ मिनीट कडवी झुंज दिल्यानंतर ह्यूनने अखेर या सामन्यात आपला पराभव मान्य केला.

या स्पर्धेआधी कश्यपने सलग २-३ सामने हातातून गमावले होते, त्यामुळे या सामन्यात कश्यप कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष होतं. आणि अपेक्षेप्रमाणे चांगला खेळ करत कश्यपनेही आपल्या चाहत्यांना निराश केलं नाही. आगामी सामन्यात कश्यपची गाठ हंगेरीच्या खेळाडूसोबत पडणार आहे.

एच.एस.प्रणॉय, समीर वर्माचीही आगेकूच –

कॅनडा ओपन स्पर्धेतील पदरी पडलेल्या पराभवाची मरगळ झटकून टाकत प्रणॉयने अमेरिकन ओपन स्पर्धेती धडाक्यात सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ल्यूक व्रॅबरवर प्रणॉयने २१-१२, २१-१६ अशी सरळ दोन सेट्समध्ये मात केली. प्रणॉयला पुढच्या फेरीतही तुलनेने नवख्या खेळाडूचा सामना करायचा आहे, त्यामुळे प्रणॉयसाठी हा सामना सोप्पा मानला जातोय.

तर दुसरीकडे ३ महिन्यांच्या दुखापतीतून सावरलेल्या समीर वर्मानेही आपल्या पहिल्या फेरीचा सामना जिंकलेला आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यावर २१-५, २१-१० अशी मात करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. तर भारताच्याच हर्शील दाणीनेही आपल्या प्रतिस्पर्ध्यावर २१-१३, २१-९ असा पराभव करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय.

त्यामुळे यापुढच्या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.