‘‘भारतामध्ये अन्य देशांप्रमाणे तंदुरुस्तीचे महत्त्त्व नाही, त्यामुळे आता देशामध्ये याबाबत जनजागृती करावी लागणार आहे. या जेतेपदाने मला हे करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे आता भारतातील तंदुरुस्ती क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्याचा माझा मानस आहे,’’ असे मुंबईच्या अनुपसिंग ठाकूरने सांगितले. अनुपने तंदुरुस्ती आणि फिजिक या गटामध्ये शनिवारी सुवर्णपदकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर रविवारी झालेल्या अ‍ॅथलेटिक्स आणि तंदुरुस्ती स्पर्धेत त्याने चौथा क्रमांक पटकावला.
‘‘भारतामध्ये शरीरसौष्ठवपटू बरेच दिसतात, पण तंदुरुस्ती या गटाकडे फारसे कुणी वळताना दिसत नाही. भारतामध्ये याबाबत अनभिज्ञता आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत मला ही गोष्ट पोहोचवायची आहे. त्याचबरोबर भारतामध्ये ‘फिटनेस सेलेब्रिटी’ ही संकल्पना जास्त लोकांना माहिती नाही, ती मला रुजवायची आहे. त्यामुळे तंदुरुस्ती आणि त्या संदर्भातील अन्य गोष्टींचा प्रचार आणि प्रसार मला भारतामध्ये करायचा आहे,’’ असे अनुप म्हणाला.
सुवर्णपदक जिंकल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना अनुप म्हणाला की, ‘‘सुवर्णपदक जिंकणे ही एक अद्भुत अशी गोष्ट होती. भारताला या प्रकारात यापूर्वी सुवर्णपदक पटकावता आले नव्हते, पण मी इतिहासावर जास्त लक्ष देत नाही. त्यामुळेच मी हे सुवर्णपदक पटकावू शकलो. सुवर्णपदक पटकावल्यावर गहिवरून आले होते. काय करावे ते सूचत नव्हते. हा आनंद कोणत्या शब्दांत व्यक्त करू, मला काहीच सूचत नाही. भारताची मान अभिमानाने उंचावू शकलो, हाच आनंद माझ्यासाठी अवर्णनीय असाच आहे.’’
पदक जिंकल्यावर काय करणार असे विचारल्यावर अनुप म्हणाला की, ‘‘गेल्या सहा महिन्यांपासून मी नीट जेवलेलो नाही. दिवसाला ४० अंडी खात होतो. पण आता जिंकल्यावर घरच्यांबरोबर आनंद साजरा करेन. गेले काही महिने साखरेचे सेवन केलेले नाही. त्यामुळे आता भारतीय जेवणाला पहिली पसंती असेल. गेले काही महिने शरीराची झीजही झाली असेल, त्यामुळे आता काही दिवस सक्तीची विश्रांती करेन.’’
अनुपची ‘तुझी-माझी लव्ह स्टोरी’
अनुप हा फक्त शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी होत नाही, तर अभिनयही करतो. नुकत्याच संपलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत त्याने धृतराष्ट्राची भूमिका केली होती. त्याचबरोबर आता तीन चित्रपटही तो करणार आहे. ‘‘या स्पर्धेनंतर मी चित्रपटाच्या छायाचित्रणाचे काम करणार आहे. यापूर्वी मी ‘महाभारत’ या मालिकेत काम केले होते. आता माझ्याकडे तीन चित्रपट आहेत. ‘तुझी-माझी लव्ह स्टोरी’ या मराठी चित्रपटाचाही यात समावेश आहे. त्याचबरोबर एक हिंदी आणि एका तामिळ चित्रपटासाठीही माझी निवड झाली आहे,’’ असे अनुपने सांगितले.