बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी खडसावले

भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. याबाबत सचिनने कोणतीही टिप्पणी केली नसली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) अनुराग ठाकूर यांनी पाटील यांना खडसावले आहे. पाटील यांनी सचिनबाबत केलेले वक्तव्य हे अयोग्य होते आणि याबाबत त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.

या वक्तव्याबाबत पाटील यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येणार का, यावर ठाकूर यांनी भाष्य टाळले आहे. पण त्यांच्याशी नजीकच्या काळात याबाबत संवाद साधण्यात येईल, असे ठाकूर यांचे म्हणणे आहे.

निवड समितीचे अध्यक्षपद सोडल्यावर पाटील यांनी एका खासगी मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी सचिनने जर एकदिवसीय संघातून निवृत्तीचा निर्णय घेतला नसता तर त्याला संघाबाहेर बसवणार होतो, असे विधान केले होते. त्याचबरोबर २०१५ च्या विश्वचषकापूर्वी महेंद्रसिंग धोनीकडून नेतृत्व काढून घेणार होतो, अशी माहितीही त्यांनी या मुलाखतीमध्ये दिली होती.

‘‘संदीप पाटील हे माजी निवड समिती अध्यक्ष आहे, त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य करायला नको होते. जेव्हा ते निवड समितीचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांना या आशयाचे बरेच प्रश्न विचारले गेले होते. त्या वेळी त्यांनी वेगळे उत्तर दिले होते. पण आता निवड समितीच्या अध्यक्षाचा कार्यकाळ संपल्यावर मात्र त्यांनी वेगळे उत्तर दिले. ही गोष्ट अयोग्य आहे,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.

ठाकूर याबाबत पुढे म्हणाले की, ‘‘संघनिवडीबाबत पाटील यांनी अयोग्य टिप्पणी केली आहे. हे मत व्यक्त करण्यापासून त्यांनी स्वत:ला परावृत्त करायला हवे होते. कारण निवड समिती अध्यक्ष या नात्याने त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला होता. निवड समितीमध्ये पाटील यांच्याबरोबर अन्य चार सदस्यही होते, पण त्यांनी अशा पद्धतीची कोणतीही टिप्पणी केली नाही.’’

या वक्तव्याबाबत पाटील यांच्यावर कोणती कारवाई करणार का, यावर ठाकूर म्हणाले की, ‘‘याबाबत पाटील यांच्याशी योग्य ती व्यक्ती नजीकच्या काळात संपर्क साधणार आहे. या वक्तव्यानंतर पाटील यांना आपल्या संस्थेत स्थान देताना दहा वेळा विचार करावा लागेल.’’

निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी यष्टीरक्षक एमएसके प्रसाद यांची निवड केल्यावर बऱ्याच जणांनी भुवया उंचावल्या होत्या. याबाबत ठाकूर म्हणाले की, ‘‘पहिल्यांदाच बीसीसीआयने निवड समितीसाठी अर्ज मागवले होते. काही माजी खेळाडूंनी या पदासाठी अर्ज केले होते. पण त्यापैकी काही जणांच्या खासगी अकादमी आहेत, तर काही संलग्न संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे हितसंबंधांच्या मुद्दय़ावरून त्यांना आम्ही हे पद दिले नाही. त्यामुळे ज्यांनी या पदासाठी अर्ज केला आणि आम्हाला जे योग्य वाटले त्यांचीच निवड करण्यात आली आहे.’’