आशिया चषक हॉकी स्पर्धेत आपला दुसरा सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने दुबळ्या बांगलादेशचा ७-० असा धुव्वा उडवला. संपूर्ण सामन्यात भारताने आपलं वर्चस्व कायम राखलं होतं, त्यामुळे यजमान बांगलादेशला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच मिळाली नाही. बांगालदेशच्या दुबळ्या खेळाचा फायदा घेत मग भारतीय खेळाडूंनीही सामन्यात चांगला सराव करत गोलची बरसात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरजंत सिंहने ७ व्या मिनीटाला भारताचं खातं उघडत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. यापाठोपाठ आकाशदीप सिंहने १० व्या तर ललित उपाध्यायने १३ व्या मिनीटाला गोल झळकावत भारताची आघाडी ३-० अशी केली. या संपूर्ण सामन्यात बांगलादेशने एकदाही भारताचा प्रतिकार केला नाही, त्यामुळे सामन्यावर वर्चस्व राखणं भारतीय संघाला सोपं गेलं.

दुसऱ्या सत्रात घरच्या मैदानावर खेळणारा बांगालदेशचा संघ भारताला काहीसा प्रतिकार करेल अशी सर्वांना आशा होती. मात्र भारतीय खेळाडूंनी ही आशाही फोल ठरवली. अमित रोहीदास, हरमनप्रीत सिंह आणि रमणदीप सिंह यांनी दुसऱ्या सत्रात पुन्हा गोलचा धडाका लावत भारतीय संघाची आघाडी ७-० अशी केली. भारताच्या या आक्रमक खेळीचं उत्तर बांगलादेशकडे नव्हतं, त्यामुळे हा सामना कमालीचा एकतर्फी झालेला पहायला मिळाला.

साखळी फेरीतले दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारताची पुढच्या सामन्यात गाठ पडणार आहे, ती आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी. गेल्या काही सामन्यांमध्ये भारत पाकिस्तानपेक्षा नेहमी वरचढ राहिलेला आहे. त्यामुळे या सामन्यात भारत विजय मिळवून पुढच्या फेरीत प्रवेश करतो का हे पहावं लागणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup hockey bangladesh 2017 india beat bangladesh by 7 0 margin
First published on: 13-10-2017 at 20:00 IST