ईडन गार्डन्स खेळपट्टीवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व बंगाल क्रिकेट असोसिएशन (कॅब) यांच्यात पुन्हा संघर्ष निर्माण झाला आहे. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीची गेली १० वर्षे देखभाल करणारे क्युरेटर प्रबीर मुखर्जी यांना हटवून त्यांच्या जागी पूर्व विभागाचे क्युरेटर आशिष भौमिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत व इंग्लंड यांच्यात ५ डिसेंबरपासून कसोटी सामना होणार आहे. त्यासाठी भौमिक यांच्याकडे खेळपट्टीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भौमिक हे त्रिपुरा क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत. ईडन गार्डन्सवर अनेक वर्षे क्युरेटर म्हणून मुखर्जी हे काम पाहत आहेत. मात्र भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पहिल्या दिवसापासून खेळपट्टी फिरकीला अनुकूल असावी, असे मत व्यक्त केले होते. तेव्हा प्रबीर मुखर्जी यांनी धोनी याने लेखी पत्र पाठवावे, असे सांगितल्यामुळेच धोनीशी मुखर्जी यांचे मतभेद झाले होते. त्यामुळेच बीसीसीआयने मुखर्जी यांना हटविले असल्याचे समजते. एकाच प्रकारच्या खेळपट्टय़ा दोन ठिकाणी करता येत नाहीत, असे मुखर्जी यांनी मत व्यक्त केले होते.
बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव सुजन मुखर्जी यांनी मात्र बीसीसीआयबरोबर कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, भौमिक यांना खेळपट्टीची पाहणी करण्यासाठीच बीसीसीआयने पाठविले असून त्यांची ही भेट नित्याचाच भाग आहे. प्रबीर मुखर्जी यांना पदावरून दूर केलेले नाही. तेच येथील खेळपट्टीचे क्युरेटर म्हणून काम करतील. ईडन गार्डन्सवरील खेळपट्टी भारतीय संघासाठी पोषक राहील. आम्हालाही स्थानिक संघाची काळजी आहे. मात्र ही खेळपट्टी पाचही दिवस ‘खेळकर’ राहील अशीच तयार करण्यात येत आहे.
बीसीसीआयच्या खेळपट्टी समितीचे अध्यक्ष दलजित सिंग यांनी ईडन गार्डन्सवरील खेळपट्टीची पाहणी केली होती. त्यानंतरच भौमिक यांना कोलकाता येथे पाठवण्याबाबत निर्णय घेतेल्याचे समजते.  बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी व आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, भौमिक यांना पाठविण्याचा निर्णय खेळपट्टी समितीने घेतला आहे. त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप केला नाही.