वेस्ट इंडिजचा संघ भारताचा दौरा अर्धवट सोडून गेल्यामुळे भारताचे आर्थिक नुकसान झाले असून यासाठी वेस्ट इंडिजबरोबरच्या मालिकांवर पाच वर्षांच्या बंदीची शक्यता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआयची बैठक २१ ऑक्टोबरला हैदराबाद येथे होणार आहे.
या बैठकीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई करता येईल, याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दौरा अर्धवट सोडल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई कशी करता येईल, याबाबत बैठकीमध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे. पण वेस्ट इंडिज आणि भारत या उभय देशांमधील मालिका पाच वर्षांसाठी बंद करण्याचा मोठा निर्णय या बैठकीमध्ये होऊ शकतो, असे म्हटले जात  आहे. उभय देशांच्या मालिकेबरोबर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना आयपीएलमधूनही बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेण्यात येईल.
‘‘मानधनाच्या मुद्दय़ावरून वेस्ट इंडिजच्या संघाने भारतीय दौऱ्यातून माघार घेण्याच्या निर्णयामुळे आमचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानभरपाईच्या मुद्दय़ासंदर्भात आम्ही आयसीसीशी चर्चा करणार आहोत. त्यासाठीच कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
श्रीलंकेविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या लढतींच्या कार्यक्रमासंदर्भात या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल. यापुढे वेस्ट इंडिजसंदर्भात आयसीसीने आखून दिलेल्या भविष्यकालीन दौऱ्यांच्या कार्यक्रमाचा विचार न करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातील एकदिवसीय सामना, एकमेव ट्वेन्टी-२० सामना आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका शिल्लक होती. त्यांनी अचानक असा निर्णय घेऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्या या निर्णयामुळे आम्हाला ऐन वेळी श्रीलंकेच्या संघाला निमंत्रण द्यावे लागले. कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर आयपीएल प्रशासकीय समितीचीही बैठक होणार असून, त्यामध्ये आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना स्थान देण्याविषयी चर्चा होणार आहे.’’ श्रीलंकेचा संघ १ ते १४ नोव्हेंबरदरम्यान पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी त्यांना परतावे लागणार असल्याने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी या तारखा निवडण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले.