कटकच्या मैदानात युवराज सिंगचे ‘अच्छे दिन’ परत आल्याचे संकेत मिळाले. २०१६ च्या सरशेवटी युवराज लगीन घाईत असताना भारतीय संघ त्याच्यापासून हाकेच्या अंतरावर कसोटी विजयाची गुढी उभारण्यात दंग होता. मोहालीच्या मैदानात विराट ब्रिगेडने साहेबांना चौथ्याच दिवशी आसमान दाखवत सामना खिशात घातला. अर्थात युवीच्या लग्नात नाचायची भारतीय संघाने घाई दाखवली म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या आनंदी क्षणी भारतीय संघातील खेळाडूंच्या गराड्यात घोडीवर बसलेला युवी मैदानात यांच्या गराड्यात कधी दिसणार? हा काळजीचा प्रश्न त्याच्या प्रत्येक चाहत्यांच्या मनाला त्यावेळी नक्कीच स्पर्शून गेला असेल.

दरम्यान, नवीन वर्षात धोनीने कमान सोडण्याची वाईट बातमी दिली अन् युवीच्या लग्नातील कोडे सुटणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. अगदी झालेही तसेच विराटच्या नेतृत्वाखालील संघात युवराज सिंगची वर्णी लागली. निवड समितीने युवराजला लग्नात द्यायचा राहिलेला आहेरच दिला असं म्हटल तरी चालेल. आता उत्सुकता लागून राहिली होती ती युवीच्या मेजवानीची. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात षटकार ठोकून खाते उघडत युवराजने षटकारांचा बादशाह असल्याचे सिद्ध केले. पण या सामन्यांत तो फार काळ मैदानात तग धरू शकला नाही. पुनरागमनाच्या पहिल्याच डावात हेजलच्या माहेरच्या लोकांना (इंग्लंडचा संघ) त्याने फारसा त्रास दिला नाही. स्टोकच्या गोलंदाजीवर युवीचा स्ट्रोक चुकला आणि तो अवघ्या १५ धावांवर बाद झाला.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटला स्वस्तात बाद करुन युवीच्या पाहुण्यांनी त्याला हवा असणारा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला. विराटने लवकर मैदान सोडल्यामुळे युवराजवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले. क्रिकेट चाहत्यांचे पूर्ण लक्ष युवराजभोवती केंद्रीत नक्कीच झाले नव्हते. याचे कारण युवराजच्यासोबत मैदानात लक्ष वेधण्यासाठी महेंद्रसिंग धोनी देखील उभा होता. भारतीय संघाची बिकट अवस्था असताना मदार आता धोनी आणि युवराजवर आली होती. पण क्रिकेट जाणकारांना या दोघांच्यातील ताळमेळ जमणार का? हा प्रश्न सतावत होता. धोनीच्या नेतृत्वाखालील संघात वर्णी लावण्यास युवराज सिंग अपयशी ठरला होता. दरम्यान दोघांच्यात शीतयुद्ध रंगल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. युवराजचे वडिल आणि माजी क्रिकेटर योगराज यांनी तर युवराजच्या पुनरागमनामध्ये धोनी विलन असल्याचे देखील म्हटले. त्यामुळे भूतकाळातील या घटना इंग्लंडसोबतच्या लढतीत भारतासाठी तापदायक ठरतील का? ही किंचितशी भिती नक्कीच डोकंवर काढत होती. मात्र दोघांनी दमदार खेळी करत भूतकाळ विसरुन भविष्यात दोघांच्यात गोडवा निर्माण होईल, अशी खेळी केली. दोघांच्यातील ताळमेळ पाहता, भूतकाळातील घटना या अफवा होत्या, असेच वाटत होते.

-सुशांत जाधव

sushantjournalist23@gmail.com