‘इंडो-पाक’ एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी रोहन बोपण्णा आणि ऐसाम उल-हक कुरेशी ही जोडी २०१४ मोसमापासून पुन्हा एकत्र खेळताना दिसणार आहे. दोन वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या या जोडीने पुढील मोसमापासून पुन्हा एकत्र खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचा बोपण्णा आणि पाकिस्तानचा कुरेशी यांनी २०११मध्ये लंडन येथील एटीपी जागतिक स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर गेली दोन वर्षे ते वेगवेगळ्या सहकाऱ्यांच्या साथीत दुहेरीत खेळत होते. मात्र त्यांना अपेक्षेइतकी चमक दाखवता आली नव्हती. त्यामुळेच पुन्हा त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाविषयी बोपण्णा म्हणाला, ‘‘जुन्या सहकाऱ्यांच्या साथीत खेळणे, ही केव्हाही चांगली गोष्ट असते. कारण नवीन सहकाऱ्यापेक्षा जुन्या सहकाऱ्याला आपले गुणदोष माहीत असतात व त्यानुसार तो खेळत असतो. आमची शैली एकमेकांना पूरक आहे आणि जेव्हा आम्ही एकत्र खेळतो, तेव्हा त्याचा अनुकूल परिणाम खेळावर दिसून येतो.’’
बोपण्णाने एटीपी क्रमवारीत जुलै महिन्यात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. त्याने विम्बल्डनमध्ये एडवर्ड रॉजर व्हॅसेलिनच्या साथीत उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती. बोपण्णाला सध्या पाचवे मानांकन आहे.
बोपण्णा-कुरेशी जोडीने २००७ मोसमापासून एकत्र खेळण्यास सुरुवात केली होती. त्यांनी २०१०मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. २०११मध्ये त्यांनी एटीपी जागतिक मास्टर्स स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. त्यामुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी ते पात्र ठरले होते. त्यांनी जोहान्सबर्ग येथील एटीपी स्पर्धेतही विजेतेपद पटकाविले होते.