* पर्थ कसोटी ठरणार पॉन्टिंगच्या कारकिर्दीमधील अखेरची कसोटी

समकालीन क्रिकेटमधील एक अभिजात फलंदाज आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला अनेक सुवर्णक्षणांची अनुभूती देणारा उमदा संघनायक रिकी पॉन्टिंगने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला. ‘पंटर’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या पॉन्टिंगने गेली १७ वष्रे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटची मनोभावे सेवा केली.
पर्थमध्ये शुक्रवारपासून सुरू होणारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी ही त्याच्या कारकिर्दीतील अखेरची कसोटी असेल. पॉन्टिंगकडून अपेक्षित असलेली कामगिरी त्याला मैदानावर साकारता येत नव्हती, या कारणास्तव त्याने आपल्या तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉन्टिंग पुढील महिन्यात ३८ वर्षांचा होईल. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या क्रमवारीत सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. पर्थमध्येच १९९५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पॉन्टिंगने कसोटी पदार्पण केले होते आता त्याच मैदानावर त्याच्या कारकिर्दीचा अस्त होणार आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पॉन्टिंगला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुन्हा कधीच दिसला नाही.
‘‘मी बराच गांभीर्याने विचार करून निवृत्तीच्या निर्णयापर्यंत आलो. गेले दोन आठवडे माझी कामगिरी पुरेशी समाधानकारक होत नव्हती. या मालिकेतील माझ्या धावा आणि संघासाठीचे योगदान यांचा विचार करूनच मी हा निर्णय घेतला,’’ असे पॉन्टिंग या वेळी म्हणाला.
‘‘फलंदाजाला व ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूला अपेक्षित असलेला दर्जा मी मैदानावर राखू शकलो नाही. माझ्या दृष्टीने मी सर्वोत्तम प्रयत्न केले. परंतु मागील १२-१८ महिने मला माझ्या कामगिरीमधील सातत्य टिकविता आले नाही. त्यामुळेच निवृत्तीचा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आली होती,’’ असे भावनिक मत पॉन्टिंगने जेव्हा व्यक्त केले, तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ पत्रकार परिषदेला उपस्थित होता.
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने पॉन्टिंगला ‘पंटर’ हे टोपणनाव दिले. चेंडूवर प्रहार करण्याची पॉन्टिंगची खुबी ही विविध देशांच्या गोलंदाजांवर दहशत पसरवायची. कसोटीमधील सर्वाधिक शतकवीरांच्या पंक्तीमध्ये पॉन्टिंग (४१) हा सचिन (५१) आणि जॅक कॅलिस (४४) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर होता.
पॉन्टिंगने भारताविरुद्ध २९ कसोटी सामन्यांमधील ५१ डावांमध्ये ५४.३६च्या सरासरीने २५५५ धावा केल्या आहेत. डिसेंबर २००३ मध्ये मेलबर्न येथील तिसऱ्या कसोटी सामन्यांत त्याने आपल्या कारकिर्दीतील २५७ धावांची सर्वोत्तम खेळी साकारली होती. भारताविरुद्ध तीन द्विशतके, पाच शतके आणि १२ अर्धशतके त्याच्या खात्यावर जमा आहेत. परंतु मागील १४ सामन्यांमधील २५ डावांमध्ये पॉन्टिंगला भारतीय भूमीवर फक्त २६.४८ च्या सरासरीने ६६२ धावा करता आल्या आहेत. ऑक्टोबर २००८ मध्ये त्याने बंगळुरू कसोटी १२३ धावांची खेळी उभारली होती. याव्यतिरिक्त पाच अर्धशतके त्याने केली होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांतील अपयशाच्या पाश्र्वभूमीवर तिसऱ्या कसोटीआधी पॉन्टिंगने निवड समिती सदस्यांशी चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. परंतु आपण स्वत:च्या मर्जीने निवृत्ती पत्करत आहोत, असे तो म्हणतो.
या पत्रकार परिषदेप्रसंगी पॉन्टिंगची पत्नी रियान्ना, दोन मुली ईम्मी आणि मॅट्टिसे यांच्यासह व्यवस्थापक जेम्स हेंडरसन त्याच्यासमवेत होते. स्थानिक संघ टास्मानियासाठी आपण हा हंगाम खेळणार असल्याचे त्याने या वेळी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधील सर्वाधिक कसोटी खेळण्याचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉच्या नावावर असलेल्या विक्रमाची पर्थ कसोटीत पॉन्टिंग बरोबरी करणार आहे. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधील एक महान फलंदाज म्हणून गौरवला गेलेला पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक धावा काढणारा क्रिकेटपटू आहे.
ब्रिस्बेन आणि अ‍ॅडलेड कसोटीमधील कामगिरीबाबत मी स्वत: समाधानी नव्हतो, असे पॉन्टिंगने सांगितले. निवृत्तीनंतरच्या भविष्यातील योजनांविषयी तो म्हणाला की, ‘‘अजून काही महिने मी टास्मानियासाठी क्रिकेट खेळणार आहे आणि भविष्यातही काही योजना आखल्या आहेत.’’
क्रिकेटविषयीच्या योगदानाबद्दल पॉन्टिंग म्हणाला की, ‘‘मी माझ्याकडून सर्वोत्तम क्रिकेट दिल्याचे मला ज्ञात आहे. गेली २० वष्रे क्रिकेट हे माझे जीवन आहे.’’
पॉन्टिंगनंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटची धुरा मायकेल क्लार्कने सांभाळली. या पत्रकार परिषदेप्रसंगी क्लार्क कमालीचा भावुक झाला होता. ‘‘अ‍ॅडलेड कसोटीनंतर पॉन्टिंगने माझ्याशी चर्चा केली होती आणि गेले काही दिवस तो निवृत्तीच्या निर्णयाजवळ येत असल्याचे मला जाणवले. या क्षणी संघातील खेळाडूंना हा मोठा भावनिक धक्का आहे. बराच काळ दर्जेदार खेळाडू म्हणून त्याने आपले स्थान टिकवून ठेवले. त्यामुळेच हा दिवस मी आज पाहत आहे. माफ करा, मी फार काळ बोलू शकत नाही,’’ असे क्लार्क या वेळी म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमधील तीन डावांमध्ये पॉन्टिंगला फक्त २० धावाच काढता आल्या होत्या. या वर्षी जानेवारी महिन्यात अ‍ॅडलेड कसोटीत पॉन्टिंगने भारताविरुद्ध २२१ धावांची संस्मरणीय खेळी साकारली होती. त्यानंतर त्याला शतक साकारता आले नव्हते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पॉन्टिंगने कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा त्याग केला. परंतु खेळाडू म्हणून तो खेळत राहिला.
पॉन्टिंगने सुमारे तीनशे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. स्टीव्ह वॉकडून चालत आलेली ऑसी संघाची क्रिकेटच्या रणांगणावरील परंपरा त्याने कायम राखली. पण पॉन्टिंग कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाने तीन अ‍ॅशेस मालिका गमावल्या. तो कर्णधार असताना अनेक संक्रमणांना त्याला सामोरे जावे लागले. वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि जस्टिन लँगरसारखे दिग्गज खेळाडू निवृत्त झाल्यानंतरही पॉन्टिंगने ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीचा आलेख कायम उंचावत ठेवला.
१९९९ मध्ये भल्या पहाटे सिडनीच्या बारमध्ये दंगा केल्याप्रकरणी पॉन्टिंगला तीन सामन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. याचप्रमाणे २०११ च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेमधील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर संतापलेल्या पॉन्टिंगने ड्रेसिंग रूममधील टीव्ही फोडला होता. या काही गोष्टींमुळे खेळाडू म्हणून त्याची प्रतिमा डागाळली होती. परंतु कर्करोगग्रस्तांसाठी पॉन्टिंग पत्नी रियानसोबत कार्य करीत आहे. दी पॉन्टिंग फाऊंडेशन ही संस्थाही त्याने सामाजिक कार्यासाठी काढली आहे.    

                     सामने    डाव    धावा    सर्वाधिक    सरासरी    शतके    अर्धशतके
    कसोटी     १६७       २८५  १३,३६६    २५७         ५२.२१        ४१          ६२
एकदिवसीय  ३७५    ३६५   १३,७०४   १६४          ४२.०३        ३०         ८२

 

* पॉन्टिंगला आजी-माजी क्रिकेटपटूंचा कुर्निसात
अविस्मरणीय कारकिर्दीबद्दल रिकी पॉन्टिंगचे अभिनंदन, ‘वेल डन’ पंटर. तुझ्या अखेरच्या सामन्याचा मी नक्कीच आनंद लुटेन, तुझ्याबरोबर खेळणे ही माझ्यासाठी आनंददायीच गोष्ट होती.
 शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू

अद्भुत कारकिर्दीबद्दल रिकी तुझे अभिनंदन. शतकाने तू कारकिर्दीचा शेवट करशील, अशी अपेक्षा आहे. तुझ्याबरोबर खेळण्यात सन्मान होता.
– ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज

अप्रतिम कारकिर्दीबद्दल तुझे अभिनंदन. तुझ्याबरोबर खेळताना मला खेळाचा आनंद लुटता आला. अखेरचा सामनाही तू अविस्मरणीय करावा.
– ब्रेट ली, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज

पंटर, अप्रतिम कारकिर्दीबद्दल तुझे अभिनंदन. तुझ्या निवृत्तीने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये न भरून निघणारी पोकळी निर्माण होईल.
– मॅथ्यू हेडन, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर

रिकी पॉन्टिंग, हा एक महान फलंदाज आहे. पॉन्टिंगच्या संघाविरुद्ध खेळणे, हा माझा सन्मान होता. निवृत्तीनंतर तुझ्याबद्दल आदर राहील आणि तुझा सन्मानच होईल.
– विराट कोहली, भारताचा फलंदाज

माझा प्रतिस्पर्धी असूनही रिकी पॉन्टिंग हा मला सर्वोत्तम फलंदाज वाटायचा. तुझ्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्वीसारखा वाटणार नाही.
– मायकेल वॉन, इंग्लंडचा माजी कर्णधार

 अद्भुत कारकिर्दीबद्दल रिकी पॉन्टिंगचे अभिनंदन. ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि हुशार फलंदाज रिकी होता. हा महान फलंदाज कायमचा स्मरणात राहील.
– सुरेश रैना, भारताचा फलंदाज