भारतीय क्रिकेट आता संक्रमणातून जाणार आहे. संघातील वरिष्ठ क्रिकेटपटूंपैकी एकेक जण आता आपली साथ सोडणार आहे. त्यांची जागा नवे खेळाडू घेतील, असेच काहीसे भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनी ऑस्ट्रेलियात बरळला होता. ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताने चारही कसोटी सामन्यांत पराभव पत्करल्यानंतरचे धोनीचे ते आत्मपरीक्षण होते. पण धोनीच्या मनीच्या गोष्टी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तळहातावरील फोडाप्रमाणे जपल्या. मिडास राजा खरे बोलतोय, हे पटल्याने ‘व्हय म्हाराजा’चे सूर भारतीय क्रिकेटमध्ये निनादले. वर्षांच्या प्रारंभी झालेली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिका आणि ऑगस्टमधील न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका या सहा महिन्यांच्या अंतरात भारतीय क्रिकेटमध्ये धोनीला अपेक्षित असलेले संक्रमण घडले. मार्च महिन्यात राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला, तर न्यूझीलंडशी कसोटी मालिका उंबरठय़ावर असताना व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने निवृत्ती पत्करली. भारतीय कसोटी क्रिकेटच्या सुवर्णकाळाचे दोन दुवे निखळले. आता उरलाय फक्त एक साक्षीदार सचिन तेंडुलकर. पण प्रसारमाध्यमे आणि माजी क्रिकेटपटू यांचा त्याच्या कामगिरीवर जागता पहारा आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. या मालिकेत सचिनकडून धावा झाल्या नाहीत, तर धोनीच्या संकल्पनेतील संक्रमणाचा अखेरचा अध्यायही लिहिला जाईल. २०१२ या वर्षांत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड अशा तीन संघांचा ९ कसोटी सामन्यांत मुकाबला केला. यात फक्त ३ विजय आणि एक अनिर्णीत सोडल्यास उर्वरित ५ कसोटी सामने गमावण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढवली. त्यामुळे भारताचा कसोटी क्रिकेटमधील स्तर खालावल्याचेच लक्षात आले. वर्षांअखेरीस भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाची चिकित्सा करताना काही मंडळींना तिन्ही प्रकारांसाठी स्वतंत्र कर्णधार नेमण्याची क्लृप्तीही सुचली. स्वाभाविकपणे विराट कोहली, गौतम गंभीर यांच्या नावाची चर्चा झाली. त्यांच्या नेतृत्वक्षमतेची उदाहरणे दिली गेली. ‘रिटायर्ड हर्ट’ म्हणजेच मन दुखावल्यामुळे निवृत्ती पत्करणारा लक्ष्मण अजून काही काळ थांबला असता तर त्याच्याकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवता आले असते.
भारतीय कसोटी संघासाठी वर्षांचा प्रारंभ अतिशय वाईट झाला. ऑस्ट्रेलियात चारही कसोटी सामने गमावणाऱ्या भारतीय संघावर टीकेचा भडिमार झाला. सचिन, द्रविड, लक्ष्मण हे कसोटीमध्ये दीपस्तंभाप्रमाणे स्थिर वाटणारे फलंदाज अपयशी ठरले. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर चांगली सलामी देण्यात आणि मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरले. भारतीय गोलंदाजांची तर कांगारूंच्या भूमीत दैनाच उडाली होती. ऑसी संघनायक मायकेल क्लार्क मनसोक्तपणे धावांचे इमले रचत होता. सिडनीच्या १००व्या कसोटी सामन्यात या क्लार्कने धावांची टाकसाळ उघडून नाबाद ३२९ धावा काढण्याची करामत केली. ऑस्ट्रेलियातील अपयशानंतरच धोनीने आपली सांघिक मते प्रसारमाध्यमांकडे मोकळी करायला सुरू केली. दिवाणखान्यातील भांडणे चव्हाटय़ावर आल्यामुळेच भारतीय संघाची आणखी वासलात लागली.
त्यानंतर सहा महिन्यांच्या विरामानंतर भारतीय संघ न्यूझीलंडशी कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला. आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा या फिरकी जोडगोळीने हा किल्ला आरामात सर केला. द्रविड आणि लक्ष्मण ही भारताची कसोटीमधील राम-लक्ष्मण जोडी गेल्यानंतर त्यांच्या जागी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी अनुक्रमे तिसरे आणि पाचवे स्थान घेतले. संयमी पुजारामध्ये काही मंडळींना द्रविडही दिसला. पण या मालिकेदरम्यान सर्वात जास्त चर्चा झाली ती सचिन तेंडुलकरची. दोन कसोटींतील ३ डावांमध्ये २७च्या सरासरीने फक्त ६३ धावा काढणाऱ्या सचिनचा तिन्ही वेळा त्रिफळा उडाला. त्यामुळे सचिनच्या हालचाली मंदावल्या आहेत. वयानुसार त्याचा धावांचा ओघ कमी झाला आहे, अशा प्रकारे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासहित अनेकांनी सचिनच्या फलंदाजीचे ‘शल्यविच्छेदन’ केले.
घरच्या खेळपट्टय़ांवर फिरकी गोलंदाजांच्या ताफ्याच्या बळावर जगातील कोणत्याही संघाला नामोहरम करता येते. किवींवरील विजयामुळे धोनीचा हाच आत्मविश्वास अधिक दृढ झाला. इंग्लंडमध्ये गतवर्षी पत्करलेल्या ४-० अशा पराभवाची सव्याज परतफेड करण्याचे स्वप्न धोनीसेनेने जपले होते. परंतु प्रत्यक्षात जे घडले ते सारेच अविश्वसनीय होते. भारतीय वातावरण आणि खेळपट्टय़ांचा पूर्णत: अभ्यास करून अ‍ॅलिस्टर कुकच्या नेतत्वाखाली इंग्लिश संघ आला होता. कर्करोगावर मात करणाऱ्या युवराज सिंगने मोठय़ा धर्याने कसोटी संघात स्थान मिळवले.
अहमदाबादच्या पहिल्या कसोटीत भारताने निर्विवाद झेंडा फडकवला. पण त्यानंतर कप्तान धोनीने संघबांधणीपेक्षा पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीचा बालहट्ट धरला. ‘धोनी बोले, बीसीसीआय डोले’ या तालावर क्युरेटर्सलाही दावणीला बांधण्यात आले. आर. अश्विन, प्रग्यान ओझा, हरभजन सिंग यांना ज्या खेळपट्टय़ांवर झगडायला लागले, तिथे माँटी पनेसार आणि ग्रॅमी स्वान या फिरकी गोलंदाजांनी कर्तबगारी दाखवली. भारताची ढासळणारी फलंदाजी, सातत्याचा अभाव असणारी फलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षण यामुळे इंग्लंडने भारतात २-१ अशा फरकाने मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला. इंग्लिश कप्तान अ‍ॅलिस्टर कुकने पहिल्या तीन कसोटी सामन्यांत सलग तीन शतके झळकावत एकंदर मालिकेत ५६२ धावा काढल्या. भारतीय मैदानांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या केव्हिन पीटरसन याने या इंग्लिश यशात कुकला चांगली साथ दिली. चार कसोटी सामन्यांच्या ६ डावांत १८.६६च्या सरासरीने ११२ धावा काढणाऱ्या सचिनवर स्वाभाविकपणे पुन्हा टीकेचा भडिमार सुरू झाला. नागपूरमधील चौथ्या कसोटीदरम्यान तर सचिनच्या निवृत्तीची जोरदार चर्चा सुरू होती. पण सचिनने नुकतीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे तूर्तास ती निवळली आहे. पण पुढील वर्षी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेदरम्यान दिग्गजांची पुन्हा ‘सचिनसमीक्षा’ सुरू राहील.
जागतिक कसोटी क्रिकेटमधील ठळक घडामोडी कसोटीमधील निर्णायकता वाढली
ट्वेन्टी-२०च्या वेगवान युगात कसोटी क्रिकेटमधील निर्णायकतेमध्येही कमालीची वाढ झाल्याचे प्रत्ययास आले आहे. २०१२ या वर्षांत झालेल्या ४१ कसोटी सामन्यांतील ३१ सामने निकाली ठरले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पाच दिवस खेळूनही कसोटी अनिर्णीत राहण्याचे दिवस आता गेले आहेत.

  दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी
गेल्या वर्षी भारताला कसोटी मालिकेत चारीमुंडय़ा चीत करून इंग्लिश संघाने कमविलेले कसोटी क्रमवारीतील अग्रस्थान या वर्षी ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने खालसा केले. ग्रॅमी स्मिथच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेच्या संघाने लॉर्ड्सच्या साक्षीने मालिकेत २-० असा विजय मिळवत अव्वल स्थान इंग्लंडकडून हिसकावून घेतले. पण त्यांचे अग्रस्थान काही काळ अधांतरी होते. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात १-० असा विजय मिळवून त्यांनी वर्षांची सांगता अव्वल स्थानावर विराजमान होऊनच केली.

  संगकारा आणि क्लार्कचा करिश्मा
श्रीलंकेचा अव्वल फलंदाज कुमार संगकाराने १४ कसोटी सामन्यांत १,४४४ धावा काढताना आयसीसी क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कारावर नाव कोरले. याचप्रमाणे ऑसी संघनायक मायकेल क्लार्कने २०१२ या वर्षांत चार द्विशतके झळकावण्याचा पराक्रम दाखविला.

  रिकी पाँटिंगचा अलविदा
जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या पंक्तीत सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर विराजमान असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान रिकी पाँटिंग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपली अखेरची कसोटी खेळला. अखेरच्या डावात फक्त ८ धावा करणाऱ्या पाँटिंगच्या खात्यावर आता १३,३७८ धावा जमा आहेत.

  पीटरसन वाद आणि स्ट्रॉसची निवृत्ती
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना एसएमएस पाठविल्याप्रकरणी इंग्लंडचा अनुभवी खेळाडू केव्हिन पीटरसन वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्याला मग उर्वरित कसोटीत वगळण्यात आले. पण या मालिकेनंतर अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. त्यानंतर नेतृत्वाची धुरा स्वीकारणाऱ्या कुकने पीटरसनला पुन्हा इंग्लिश संघात आणून निर्धाराने भारतावर स्वारी केली.

  मार्क बाऊचरचा अपघाती अलविदा
सॉमरसेटविरुद्धच्या सराव सामन्यात यष्टीवरील बेल्स डाव्या डोळ्याला लागल्याने दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक मार्क बाऊचरला नाईलाजास्तवपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करावा लागला.

  दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाचे शतक
बांगलादेशच्या अबू हसनने दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून पदार्पणातच शतक झळकावण्याचा पराक्रम दाखवला. नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात ११३ धावा काढणाऱ्या हसनने शंभरहून अधिक वर्षांचा विक्रम मोडित काढला.