भारतीय संघाच्या विजयाचा अश्वरथ सध्या सातत्यपूर्ण वाटचाल करीत असला तरीही आमच्या संघातही त्यांना सडेतोड उत्तर देण्याची क्षमता आहे. आम्ही येथे विजय मिळवण्यासाठीच आलो आहोत व शेवटपर्यंत आम्ही त्याच ध्येयाने खेळणार आहोत, असे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी सांगितले.

भारतीय संघाने न्यूझीलंड, इंग्लंड व बांगलादेश यांच्याविरुद्ध शानदार विजय मिळविले आहेत. घरच्या मैदानावर व वातावरणात भारताचे पारडे जड मानले जात आहे. याबाबत विचारले असता लेहमन म्हणाले, ‘‘आमच्या संघातील काही खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळत असल्यामुळे येथील वातावरण व खेळपट्टी याचा त्यांना सराव आहे. रविचंद्रन अश्विन याच्यासह सर्वच गोलंदाजांनाही त्यांनी तोंड दिले आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत आमचे फलंदाज भारतीय फिरकीबाबत कोणतेही दडपण घेणार नाहीत याची मला खात्री आहे.’’

डेव्हिड वॉर्नरच्या साथीला सलामीला कोण उतरणार, याचीच उत्सुकता आहे. मॅट रेनशॉ व उस्मान ख्वाजा यांच्यापैकी एकाला ही संधी मिळेल. त्याबाबत विचारले असता लेहमन म्हणाले, ‘‘हे दोन्ही खेळाडू अव्वल दर्जाचे असल्यामुळे हा निर्णय घेणे थोडेसे अवघड आहे, तरीही आम्ही अंतिम निर्णय बुधवारी घेऊ. रेनशॉला भारत ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यात सलामीस खेळण्याची संधी दिली होती, मात्र त्याला अपयश आले होते. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत तडाखेबाज शतक झळकावले होते, ही गोष्ट विसरता येणार नाही.’’

ते पुढे म्हणाले की, ‘‘ ख्वाजानेही अन्य देशांविरुद्ध चांगली कामगिरी केली होती, मात्र आशियाई वातावरणात त्यांची कामगिरी निराशाजनक झाली आहे, हीच माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. प्रत्यक्ष खेळपट्टीचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतरच आम्ही याबाबत अंतिम निर्णय घेणार आहोत. शॉन मार्श व कर्णधार स्टीव्हन स्मिथ हे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर खेळतील. त्यांच्यापाठोपाठ पीटर हँड्सकोम्ब व मिचेल मार्श यांना फलंदाजीची संधी मिळेल. मार्शने श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीत चांगले यश मिळवले होते.’’