यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी सर्वात जास्त संधी असेल. वातावरण हा मुद्दा विश्वचषकासाठी नेहमी महत्त्वाचा असतो. मायदेशातील अनुकूल वातावरणाचा ऑस्ट्रेलियाचा संघ चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकेल, असे मला वाटते. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत चार वेळा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे त्यांची घोडदौड रोखणे हे आव्हानात्मक असेल. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची गेल्या वर्षभरातील कामगिरी ही डोळे दिपवणारी अशीच आहे. सध्याचा हा संघ उपांत्य फेरीसाठी मजबूत दावेदार असेल. याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेमधील वातावरण हे बहुतांशी ऑस्ट्रेलियासारखेच असल्यामुळे त्यांना याचा निश्चित फायदा होईल. ऑस्ट्रेलियात फक्त मैदानांचे आकार मोठे असतात, त्यामुळे वेगळ्या प्रकारे रणनीती द. आफ्रिकेसह सर्वच संघांना आखावी लागणार आहे.
वेगवान गोलंदाजांसाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टय़ांवर कर्तृत्व दाखवण्याची चांगली संधी असेल. ऑस्ट्रेलियात चेंडू खूप काळ नवा राहतो, परंतु या विश्वचषकात प्रत्येक डावात दोन्ही बाजूंनी स्वतंत्र दोन चेंडूचा प्रयोग होणार असल्यामुळे वेगवान गोलंदाजांसाठी ते अनुकूल ठरू शकेल. ज्या संघाकडे चांगला गोलंदाजीचा मारा असेल, त्यांना या विश्वचषक स्पध्रेत चांगले यश मिळेल. ऑस्ट्रेलियातील वातावरणाकडे पाहता या विश्वचषकात फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही पराक्रम दाखवण्याची समतोल संधी आहे. आपण सध्या चालू असलेल्या तिरंगी क्रिकेट स्पध्रेचा अंदाज घेतल्यास २४० धावांचे लक्ष्यसुद्धा पेलणे संघाला किती कठीण जाऊ शकते, हे प्रत्ययास येते. या तिरंगी स्पध्रेत भारतीय संघाची कामगिरी फारशी समाधानकारक जरी झाली नसली तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही. भारतीय संघ समतोल आहे. आता ते कशी कामगिरी बजावतात आणि आपले विश्वविजेतेपद कसे टिकवतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
नीलेश कुलकर्णी, माजी क्रिकेटपटू

शब्दांकन : प्रशांत केणी