इंग्लंडचा युवा क्रिकेटपटू झाफर अन्सारी याने वयाच्या २५ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला. इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात पदार्पण करून अवघ्या सहा महिन्यांमध्ये झाफर अन्सारीने निवृत्तीचा निर्णय घेतला. कायद्याच्या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार असल्याने क्रिकेट क्षेत्राला अलविदा करण्याचे त्याने ठरवले.

”सात वर्षांच्या व्यावसायिक क्रिकेटला पूर्णविराम देण्याचा मी निर्णय घेतला आहे. खरंतर हा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मनावर दगड ठेवून जड अंत:करणाने मी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. पण पुढे जाण्यासाठी हिच योग्य वेळ असल्याचे मला वाटते. कायदे विषयक क्षेत्रात मी पुढील शिक्षण घेण्याचे ठरविले असले तर क्रिकेट हा माझ्या आयुष्याचा एक भाग होता हे मी कधीच विसरू शकत नाही.”, असे झाफर अन्सारीने सांगितले.

 

अन्सारीने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत इंग्लंडच्या संघाकडून पदार्पण केले होते. अन्सारीने २०१३ साली केंब्रीज विद्यापीठातून राजकारण आणि समाजशास्त्रातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. याशिवाय, मागील वर्षी पदवीनंतरचेही शिक्षण त्याने घेतलं आहे.