इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे वेगवान गोलंदाज प्रभाव दाखविण्यात अपयशी ठरले. या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने भारतीय गोलंदाजीचा भविष्यकाळ निराशाजनक असल्याचे नमूद केले आहे. याचप्रमाणे भारतीय संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची वेळ आली आहे, असे म्हटले आहे.
प्रग्यान ओझा (२० बळी) आणि रविचंद्रन अश्विन (१२ बळी) वगळल्यास या मालिकेत एकाही भारतीय गोलंदाजाला पाचहून अधिक बळी मिळविता आले नाही. त्यामुळे भारताने ही मालिका १-२ अशा फरकाने गमावली.
‘‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास भारतीय गोलंदाजीचा भविष्यकाळ निराशाजनक आहे. तिन्ही कसोटी सामन्यांत झहीर खानची कामगिरी सामान्य झाली आणि त्यानंतर त्याला वगळण्यात आले. इशांत शर्माने पाच वष्रे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट खेळल्यानंतर अधिक सातत्यपूर्ण गोलंदाजी करायला हवी,’’ असे अक्रमने सांगितले.
‘‘मोहम्मद सामीप्रमाणे इशांतची गुणवत्ता वाया जाईल, अशी मला भीती वाटते आहे. उमेश यादवला दुखापतीने पछाडले आहे. निवड समिती वरुण आरोनचा विचार करीत नाही,’’ असे अक्रम यावेळी म्हणाला.